श्री दुर्गा सप्तशती संपूर्ण पाठ मराठी मध्ये
श्री दुर्गा सप्तशती संपूर्ण पाठ मराठी मध्ये अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण धार्मिक ग्रंथ आहे. या सप्तशतीचा संपूर्ण पाठ भक्तांना देवी दुर्गेची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यावश्यक मानला जातो. श्री दुर्गा सप्तशती संपूर्ण पाठ मराठी मध्ये केल्यास, देवीच्या आशीर्वादांची अनुभूती घेता येते.
मराठी भाषेत दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याने भक्तांच्या मनःशांतीसाठी, संकटांचे निवारण करण्यासाठी, आणि जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो. दुर्गा सप्तशती संपूर्ण पाठ मराठी मध्ये उपलब्ध असल्याने, भक्तगण सहजपणे घरबसल्या पाठ करू शकतात आणि देवीच्या कृपाशीर्वादाचा लाभ घेऊ शकतात.
Complete Durga Saptashati Path in Marathi
The Durga Saptashati in Marathi is a sacred and highly revered text. The Complete Marathi Durga Saptashati path is considered essential for devotees seeking the blessings of Goddess Durga. Performing the Durga Saptashati path in Marathi allows devotees to experience the grace of the Goddess in a profound way.
Reciting the Durga Saptashati in Marathi helps in attaining peace of mind, overcoming obstacles, and finding solutions to life’s challenges. Since the Complete Marathi Durga Saptashati is readily available, devotees can easily perform the path from the comfort of their homes and receive the divine blessings of the Goddess.
।। सप्तश्लोकी दुर्गा ।।
श्रीगणेशाय नमः । ॐ ऐम् हीम् श्रीम् क्लीम् परमेश्वरी स्वाहा । शिव म्हणे अंबेसी । या भयंकर कलियुगासी । तू एक त्वरित पावसी । कलौ चण्डी विनायकौ ।। १ ।। म्हणौनी सर्व कार्य विधायक । उपाय सांगे त्वरित । जेणे भक्त मनोरथ । पूर्ण होती निश्चये ॥ २ ॥ देवी म्हणे सांगते ऐका । कलियुगात साधन देखा । जगदंबा स्तुती प्रकाशका । केली असे भूमंडळी ।। ३ ।। त्याचे करिता पाठ । पूर्ण होती मनोरथ । हे सर्वोत्कृष्ट साधन असत । सप्तशती म्हणोनिया ।। ४ ।। ॐ सप्तश्लोकी स्तोत्रासी । नारायण म्हणा ऋषी । अनुष्टुप् छंदासी । त्रिविध देवता जाणाव्या ।। ५ ।। पंडित आणि महाज्ञानी । ऐशा जना पाहोनी । ठेवी विविध प्रकारे मोहोनी । देवी महामाया ती ।। ६ ।। सर्व बाधा निवारी । शत्रुत्वाचा विनाश करी । त्रैलोक्यवासी ईश्वरी । वर देई आम्हाते ||७||
॥ अथ श्रीदेव्याकवचम् ॥
श्री गणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः | श्रीगुरुभ्यो नमः । ॐ नमश्चण्डिकायै । या चण्डिकवचाते । ब्रह्माऋषी म्हणा वाचे । मातृकाबीज दिग्बंध तत्त्वाते । चामुण्डादेवी असे देखा ॥१॥ श्रीसप्तशती पाठापूर्वी । कवच पठण करावे आधी । श्री जगदंबा प्रीत्यर्थी । जपे विनियोगा म्हणावे।।२।। ॐ मार्कण्डेय म्हणे पितामह । या लोकी जे परमगुह्य । सर्व रक्षा कर स्तोत्र । ते सांगावे मजलागी ।। ३ ।। ऐकोनिया ऋषिवचन । म्हणे ब्रह्मदेव आपण । देवी कवच महापुण्य । सांगेन ऐक मुनिवर्या ।।४।। प्रथमम् शैलपुत्री च । द्वितीयम् ब्रह्मचारिणी । तृतीयम् चन्द्रघण्टेती । कूष्माण्डेती चतुर्थकम् ।।५।। पंचमम् स्कंद मातेती । षष्ठं कात्यायनीतीच । सप्तमम् कालरात्रिती । महागौरीती चाष्टमम् ।। ६ ।। नवमम् सिद्धीदात्री च । नवदुर्गा प्रकीर्तीता । ब्रह्मदेव सांगता । झाला पाहा सर्वांसी।। ७ ।। शरणागतासी सर्वत्र । दुर्गादेवीचा अभयकर । रक्षितसे निरंतर । महाभया पासोनिया ।। ८ ।। अग्नित पडता भक्त । रणांगणी युद्धात । अथवा महा आपत्तीत । दुर्गा रक्षित सर्वदा ।। ९।। त्यांसी नसे अशुभ काही । दुर्गा ज्याची धरे बाही। शोक दुःख भय त्यास नाही । सर्वत्र विजयी सर्वदा ।। १० ।। जे भक्तीने स्मरण करिती । त्यासी तात्काळ देई प्रचिती । आयुरारोग्य आयुष्य संपत्ती । देवी त्यासी देतसे ।। ११।। शवासनी चामुण्डा । वाराही महिषासना । ऐन्द्री गजवाहना । ऐसी वाहने अंबेची ।। १२ ।। वैष्णवी गरुडासनी । माहेश्वरी वृषभवाहनी । कौमारी मयुरासनी । ऐसी वाहने अंबेची ।। १३ ।। हरिप्रिया महालक्ष्मी । पद्मासनात बसोनी राही । पद्महस्त धरोनी देई । संपदा आपुल्या भक्तासी ।।१४।। श्वेतरूप धरा देवी । वृषभ वाहन ईश्वरी। हंसवाहिनी ब्राह्मी । ऐशा मातृदेवता ।। १५ ।। ऐसी रूपे अनेक । धरोनी जग रक्षित । भक्तांते प्रतिपाळीत । दुर्गा देवी सर्वदा ।। १६ ।। अलंकार आभूषणे । तेज सौंदर्याचे लेणे । देवदेवता एकपणे । दुर्गा स्वरूपी जाहल्या ।। १७ ।। ऐसी दुर्गा प्रकटली । अनेक रूपे घेती जाहली । रथावरी आरूढली । दैत्यसंहार करावया ॥ १८ ॥ शंख चक्र गदा शक्ती । परशू पाश अंकुश करी । धरोनी सिद्ध जाहली । दैत्यसंहार करावया ।। १९ ।। करावया दैत्यांचे हनन । शस्त्रे धरी हाती दारुण । देवतांचे करी रक्षण | अभय देई भक्तांसी ।। २० ।। ऐशा जगत्जननीचे । स्तवन करावे मनोवाचे । मानव-देव समूहाचे । रक्षण जिने केले सदा ।। २१ ।। ॐ नमस्तेस्तु महारौद्रे । महाघोर पराक्रमे । महाबले महोत्साहे । भय विनाशिनी दुर्गे तू ॥ २२ ॥ दुर्गे करी मम रक्षण । शत्रूसी भय दारुण । तुजकडे पाहे कोण ? | तुज नमस्कार आमुचा ।। २३ ।। पूर्व दिशेकडे ऐन्द्री । आग्नेय दिशेकडे अग्निमयी । दक्षिणेकडून वाराही । रक्षी माते सर्वदा ।। २४ ।। हाती खड्ग घेवोनी । रक्षी नैर्ऋत्य दिशेकडूनी । पश्चिमेकडून वारुणी । वायव्यी रक्षी दुर्गे तू ।। २५।। उत्तर दिशेसी कौमारी । ईशान्यी शूलधारिणी । ऊर्ध्वं ब्रह्माणी रक्ष । अधो वैष्णवी पाही तू ।। २६ ।। दाही दिशांकडून । रक्षी देवी कृपा करोन । आणि मजला सोडून । दुर्गे कधी तू राहू नको ।। २७ ।। जयादेवी तू पुढून रक्षी । विजयादेवी तू पाठ रक्षी । वामबाजूने अजिता रक्षी । रक्षी दक्षिणे अपराजिता ।। २८ ।। शिखेसी रक्षी उद्योतिनी । उमा राही मम मस्तकी । मालाधरी ललाट रक्षी । भुवया यशस्विनी राखी तू ।। २९ ।। त्रिनेत्रधारिणी दुर्गे । कूटस्थ राखावे माझे । यमघण्ट नासिकेते । रक्षावे सदा देवी तू ।। ३० ।। कर्ण द्वारवासिनी । नेत्र पाहे शंखिनी । कालिका कपाळ पाही । शांकरी कर्ण मूला ।। ३१।। सुगंधा नासिका रक्षी । उत्तरोष्ठ चर्चिका देवी । अधरोष्ठाते अमृता पाही । जिव्हाग्री सरस्वती राहे तू ।। ३२ ।। कण्ठ आणि दात । चण्डिका कौमारी रक्षत । चित्रघंटा राही गळ्यात । टाळू महामाये रक्षी तू ।। ३३ ।। हनुवटीत राहो कामाक्षी । सर्व मंगला वाचा रक्षी । भद्रकाली मान रक्षी । धनुर्धरी रक्षी पाठ तू ।। ३४ ।। कंठाबाहेर भागासी । नीलग्रीवा तू त्यासी । नलिकांसी नलकूबरी । देवी तू ते रक्षावे ।। ३५ ।। खड्गिनी देवी खांद्याते । वज्रधारिणी बाहू ते । दण्डिनी रक्षी हाताते । अंबिका अंगुली रक्षी तू ||३६|| नखांसी रक्षी शूलेश्वरी । जठराते रक्षी कुलेश्वरी । स्तनाते रक्षी महादेवी । मनासी शोक नाशिनी तू ।। ३७ ।। ललिता रक्षी हृदयास । शूलधारिणी उदरास । नाभीसी कामिनी रक्ष । गुह्यासी गुह्येश्वरी तू ॥ ३८ ॥ भगवती राखी कटीसी । पूतना कामिका शिश्रासी । गुद रक्षी महिषवाहिनी । गुढघे विंध्यवासिनी तू ।। ३९ ।। महाबला पोटऱ्या राखी । तैजसी राखी पायासी । नारसिंही दोन्ही घोट्यांसी । पादांगुली श्रीदेवी तू ॥ ४० ॥ दंष्ट्राकराली नखांसी । ऊर्ध्वकेशी पाही केशांसी । कौबेरी रक्षी रोम छिद्रांसी । त्वचेसी वागेश्वरी तू ॥ ४१ ॥ रक्त मज्जा मांस अस्थीसी । पार्वती तू रक्षी । कालरात्री पाही आतड्यासी । मुकुटेश्वरी रक्षी पित्ताते ॥४२॥ पद्मावती षड्चक्राते । चुडामणी पाही कफाते । ज्वालामुखी पाही नखाते । रक्षी अभेद्या सर्व सांध्यांसी ॥ ४३ ।। ब्रह्माणीदेवी शुक्र राखी । छत्रेश्वरी छाया राखी । अहंकार मन बुद्धी राखी । धर्मधारिणी देवी तू ।। ४४ ।। प्राण अपान व्यान उदान । आणि पाचवा तो समान । या वायूते रक्षावे जाण । वज्रहस्ता देवीने ।। ४५ ।। शब्द स्पर्श रूप रस गंध । याते योगिनी रक्षित । सत्त्व रज तम गुणांस । रक्षी नारायणी देवी तू ।। ४६ ।। मम आयुष्याचे रक्षण | वाराही करी स्वये आपण । धर्मकार्याचे संरक्षण । वैष्णवी त्वा करावे ।। ४७ ।। यश कीर्ती लक्ष्मी धन विद्या । चक्रिणी रक्षी सर्वथा । इंद्राणी सर्व गात्राते । चण्डिके स्वभाव रक्षी तू ॥ ४८ ॥ भक्ती रक्षे महालक्ष्मी । शक्ती रक्षी भैरवी । सन्मार्ग सुपथा देवी । दावी माते सर्वदा ।। ४९ ।। क्षेम करी देवी मार्गात । महालक्ष्मी राजदरबारात | विजयादेवी राखोत । सदा सर्वदा मजलागी ।। ५० ।। कवचात नाही वर्णने । जयन्तीने रक्षावी ती स्थाने । पापनाश करोनी । सन्मार्गी न्यावे सर्वांसी ॥ ५१ ॥ ज्यासी वाटे शुभ व्हावे । त्याने कवचावृत्त व्हावे । एकही पाऊल न टाकावे । कवचाविण सर्वथा ।। ५२ ।। ऐसे करिता देख । सर्वत्र विजय होत । मनी धरिले सिद्ध होत । सद्भक्तांचे सर्वदा ॥५३॥ परम ऐश्वर्य होई प्राप्त । निर्भय सदैव राहत । संग्रामी अपराजित । त्रिलोकी पूज्य होतसे ।। ५४ ।। हे दुर्गेचे कवच | देवांनाही दुर्लभ असत । त्रिकाल वाचिता नित्य । दैवीकला प्राप्त होतसे ॥। ५५ ।। त्रिलोकी विजय होत । शतवर्ष आयु भोगत । अपमृत्यू न होत । पुण्यवान त्या पुरुषाचा ।। ५६ ।। सर्व व्याधि नष्ट होती । विष सर्वही निवारिती । करणी मंत्र तंत्र पळती । पठणे नित्य कवचाच्या ।। ५७।। भूचर जलचर खेचर । अंतरिक्ष डाकिणी घोर । पळोनी जाती सत्वर । पठण मात्रे कवचाच्या ।। ५८ ।। ग्रह भूत पिशाच्च । गंधर्व राक्षस यक्ष । यासी करो शके नष्ट । पठणे मात्र कवचाच्या ।। ५९ ।। वेताळ कूष्मांड भैरव । ब्रह्मराक्षस महाघोर । सोडूनी देती शरीर । पठण मात्रे कवचाच्या ॥ ६० ॥ कवच हृदयी धरिले । दुर्गेने त्यासी रक्षिले । ऐसे माहात्म्य आगळे । कवचा माजी असे हो ।। ६१ ।। वंदन करी नृपती । यशवर्धन कीर्ती । कवच, जप, सप्तशती । ऐसे माहात्म्य दुर्गेचे ।।६२ ।। यावत्चंद्रो दिवाकर । पृथ्वी नक्षत्र ग्रह थोर । कीर्ती राहे तोवर । ऐसा महिमा दुर्गेचा ।। ६३ ।। पुत्र पौत्र सुखे नांदती । देहान्ती परमगती । शिवसान्निध्याची प्राप्ती । दुर्गा देई भक्ताते ।। ६४॥
।। स्वस्ति श्रीदेव्याकवचम् ।। (ओवी संख्या ६४ )
॥ अर्गला स्तोत्र ॥
ॐ अर्गला स्तोत्राते । विष्णुऋषी । अनुष्टुप् छंद म्हणा वाचे । महालक्ष्मी देवता प्रीत्यर्थे । जपे विनियोगा म्हणावे ।। १ ।। ॐ जयंती मंगला काली । भद्रकाली कपालिनी । दुर्गा क्षमा शिवा धात्री । स्वाहा स्वधा नमोस्तुते ।। २ ।। चामुण्डा तुझा जयजयकार । मानवाचे दुःख करी दूर । स्मरता धावसी तत्पर । कालरात्री तुज नमो || ३ || मधुकैटभाचा संहार । ब्रह्मदेवा देसी वर । रूप जय यश देई । शत्रू मारी आमुचे ।। ४ ।। महिषासुराचा नाश । भक्ता देसी वर हर्ष । रूप जय यश देई । शत्रू मारी आमुचे ॥५॥ रक्तबीज मारीला तुने । चण्डमुण्ड विनाशिनी । रूप जय यश देई । शत्रू मारी आमुचे ।।६।। शुंभ आणि निशुंभाला । धूम्राक्ष तोही तू वधिला । रूप जय यश देई । शत्रू मारी आमुचे ॥७॥ तव चरण युगुलांचे वंदन । करिती सौभाग्या कारण । रूप जय यश देई । शत्रू मारी आमुचे ॥ ८ ॥ अचिन्त्य रूप चरिते । सर्व शत्रू विनाशिनी । रूप जय यश देई । शत्रू मारी आमुचे ॥ ९ ॥ जे तुझे भक्तीने स्तवन करीत। पापापासून दूर रहात । रूप जय यश देई । शत्रू मारी आमुचे ।। १० ।। चण्डिके पूर्वी भक्तांनी । स्तविले व्याधिनाशिनी । रूप जय यश देई । शत्रू मारी आमुचे ।।११।। चण्डिके जे कोणी भक्त । तुझी आराधना करीत । रूप जय यश देई । शत्रू मारी आमुचे ||१२|| दे सौभाग्य आरोग्य। देई माते परमसुख । रूप जय यश देई । शत्रू मारी आमुचे ||१३|| जे माझा द्वेष करिती । त्यांसी तू न ठेवी क्षिती । रूप जय यश देई । शत्रू मारी आमुचे ||१४|| देवी माझे कल्याण । करी संपत्ती प्रदान । रूप जय यश देई । शत्रू मारी आमुचे ।। १५ ।। देवता आणि दैत्य । तुझे चरणी नतमस्तक । रूप जय यश देई । शत्रू मारी आमुचे ।। १६ ।। विद्यावंत करी यशवंत करी । लक्ष्मी भक्ता तू देई । रूप जय यश देई । शत्रू मारी आमुचे ।। १७ ।। दैत्य दर्प दूर केले । प्रचंड पराक्रम केले । रूप जय यश देई । शत्रू मारी आमुचे ।। १८ ।। ब्रह्मदेव स्तवन करी । ऐशी तू परमेश्वरी । रूप जय यश देई । शत्रू मारी आमुचे ॥ १९ ॥ विष्णू तुझे चिंतन । सदा करी तव स्तवन । रूप जय यश देई । शत्रू मारी आमुचे ।। २० ।। महादेव हिमनग जामात । परमेश्वरी तुते स्तवित । रूप जय यश देई । शत्रू मारी आमुचे || २१ || स्वर्गलोकीचा इंद्र । परमेश्वरी तुज स्तवन करीत । रूप जय यश देई । शत्रू मारी आमुचे ।।२२।। प्रचंड दैत्याचे चूर्ण । केले भूमीसी पावन । रूप जय यश देई । शत्रू मारी आमुचे ।।२३।। भक्ताते आनंद देत । वर आणि मोक्ष देत । रूप जय यश देई । शत्रू मारी आमुचे ॥ २४ ॥ देई पत्नी सुंदर । भवसागर करी पार । उत्तम कुल साचार । आचरे मोक्षमार्गाते ।। २५ ।। या स्तोत्राचे करिता पठण । सप्तशत शक्ती संपन्न । भक्ता प्राप्त होवोन । विजयी होई सर्वदा ।। २६ ।।
।। स्वस्ति अर्गला स्तोत्र ।। (ओवी संख्या २६ )
॥ श्री अर्गला स्तोत्र ॥
ॐ ऐम् हीम् श्रीम् क्लीम् परमेश्वरी स्वाहा । आदि अंत रहित देवी । परात्पर परमेश्वरी । भक्ती दे ज्ञान दे शांती दे । करुणेश्वरी ।। १ ।। देवी पूर्वी प्रकटोन । अपार उद्धरिले जन । भक्ती दे ज्ञान दे शांती दे । करुणेश्वरी ।। २ ।। जागृती स्वप्न सुषुप्तीत । राही सदैव ध्यानात । भक्ती दे ज्ञान दे शांती दे । करुणेश्वरी ।। ३ ।। दुर्गे दुर्गार्ती शमनी । म्हणूनी प्रार्थिती ऋषी मुनी । भक्ती दे ज्ञान देशांती दे । करुणेश्वरी ।। ४ ।। देवता वंदिती चरण । ऐसे तुझे महिमान । भक्ती दे ज्ञान दे शांती दे करुणेश्वरी ।। ५ ।। विष्णूने स्तविले तुजसी । सनतकुमार स्तवी तुजसी । भक्ती दे ज्ञान दे शांती दे । करुणेश्वरी ।। ६ ।। सर्व ईश्वरांची ईश्वरी । ॐ ऐम् व्हीम् श्रीम् क्लीम् परमेश्वरी । भक्ती दे ज्ञान देशांती दे । करुणेश्वरी ।। ७ ।। दत्तावधूताचे अंतरी । व्यापोनी राहे सर्वेश्वरी । भक्ती दे ज्ञान दे शांती दे । करुणेश्वरी ।। ८ ।। देई सर्व सद्गुण । सायुज्य मुक्तीचे स्थान । परमात्म्याशी मिलन । देई व भक्ताते ।। ९ ।। भरो शांतीने विश्व । व्हावे आध्यात्मिक विश्व । भक्ती ज्ञान प्रेम युक्त । व्हावे अखिल विश्व हे ।।१०।।
।। स्वस्ति श्रीदत्तावधूत विरचित अर्गलास्तोत्र ।। (ओवी संख्या १०)
॥ कीलकस्तोत्र ॥
।। अथ कीलकम् ।।
ॐ अस्य श्री कीलक स्तोत्रासी । शिव ऋषी मंत्रासी । अनुष्टुप् छंदासी । महासरस्वती देवता म्हणावे ।। १ ।। सप्तशती पाठाचे अंग म्हणोन । कीलक स्तोत्राचे करावे पठण । जगदंबा प्रीत्यर्थे म्हणून । जपे विनियोगा म्हणावे ॥ २ । । विशुद्ध ज्ञान ज्याचे शरीर । तिन्ही वेद दिव्य नेत्र । मुकुट ज्याचा अर्धचंद्र । त्या शिवासी नमितसे || ३ || करोनी शिवाचे स्मरण । करावे सप्तशती पारायण । होईल त्याचे कल्याण । शिवकृपेने सर्वदा ॥ ४ ॥ नको मंत्र पुरश्चरण । नको विद्यादी साधन । होतील सर्व इच्छा पूर्ण । पठण मात्रे ग्रंथाच्या ।। ५ ।। स्वये महादेव म्हणत । सप्तशती ग्रंथ श्रेष्ठ । दुर्गादेवी मूर्तिमंत । पठणे साकार होतसे ॥ ६ ॥ करिता सहस्त्र पारायण । अंबा होतसे प्रसन्न । ऐसे असे महिमान । दुर्गा सप्तशती ग्रंथाचे ॥ ७ ॥ जप करता एक सहस्त्र । मंत्रसिद्धी अद्भुत । प्राप्त होऊनी साधकाप्रत । अपार शक्ती देतसे ।। ८ ।। झाला याचा दुरुपयोग । चिंतिती देव समग्र । शिवे कीलीत केले स्तोत्र। म्हणोनि पाहा तेधवा ।। ९ ।। तै पासोनी सप्तशती ग्रंथ । झाला पाहा मर्यादित । परी भाविका पुण्य प्राप्त । अपार जाणा होतसे ॥ १० ॥ कृष्ण पक्षातील अष्टमी । अथवा चतुर्दशी पाहोनी । सर्वस्व देवी चरणी । वाहोनी नमन करावे || ११ || स्पष्ट उच्चारणासहित । पठण करावा ग्रंथ । ऐसे करिता सिद्ध । ग्रंथ जाणा होतसे ||१२|| तो देवीचा अनुचर । होऊनी राहे बरोबर । अंतरिक्षात संचार । देवी सवे करी सदा || १३ || श्री दुर्गादेवी प्रसन्न । होऊनी देई वरदान । ऐश्वर्य आरोग्यसंपन्न । प्राप्त जाणा होतसे ।। १४ ।। कल्याणमयी जगदंबा । भक्ताते प्रतिपाळी सदा । करतळी जैसा आवळा । तैसा मोक्ष करीतसे ।। १५ ।।
।। स्वस्ति देवी कीलकस्तोत्र ।। (ओवी संख्या १५ )
॥ अथ वेदोक्त रात्री सूक्तम् ॥
ॐ रात्री सूक्त स्तोत्रासी । कौशिक भारद्वाज ऋषी । रात्रीदेवता परियेसी । गायत्री छंद म्हणावा ।। १ ।। ऐसे म्हणोनी वेदोक्त । पठण करावे रात्री सूक्त । सप्तशती पाठाअंतर्गत । विनियोग याचा करावा ॥ २ ॥
॥ अथ रात्री सूक्त प्रारंभ ||
ॐ नमो रात्रीदेवी । शुभाशुभ कर्म जीवी । होती जाती जी विश्वी । त्यासी साक्षी हसी तू ।। ३ ।। वृक्षलतादी समग्र । जीवसृष्टीसी आधार । हरिसी अज्ञान अंध:कार । क्षणमात्रेतू भक्ताचा ।। ४ ।। तुझी जव कृपा होत । अज्ञान समूळ नष्ट होत । उषादेवी प्रकटत | हृदयामाजी भक्ताच्या ।। ५ ।। तुझिया प्रभावे करोन । जीवसृष्टी करी शयन । सुखपूर्वक निद्राधीन । जग संपूर्ण होतसे ।। ६ ।। हे देवी चित्शक्ती । आम्हावरी करी दृष्टी । दुष्ट वासना दुर्बुद्धी । नष्ट आमुची तू करी ।। ७ ।। भक्ती ज्ञान सन्मार्ग । परमात्मा परमेश्वर । दावी आम्हा मोक्षमार्ग । ऐसी कृपा तू करी ।। ८ ।। रात्रीदेवीचे स्तवन । पाठा आरंभी करोन । करोनी तिजला वंदन । उदयोस्तु अंबे म्हणावे ॥९॥
।। वेदोक्त रात्री सूक्तम् ।। (ओवी संख्या ९)
॥ अथ तंत्रोक्त रात्री सूक्त स्तोत्र ॥
ॐ विश्वेश्वरी जगत्धात्री । स्थिती संहारकारिणी । श्रीविष्णूची मोहिनी । तेजस्विनी तुज नमो ॥। १ ।। तू स्वाहा तू स्वधा नित्या । तू वषट्कार स्वरात्मिका । सुधा अक्षर तू नित्या । मात्रात्मिका तुज नमो ।। २ ।। अर्धमात्रेत स्थित । जी शक्ती अतिरिक्त । संध्या, सावित्री आरक्त । जगत्जननी तुज नमो ॥। ३ ।। करिसी विश्वासी धारण । करिसी विश्वाचे पालन । अंती नाश संपूर्ण । या विश्वाचा करिसी तू ॥ ४ ॥ उत्पन्न करिसी विश्व जेव्हा । म्हणती ब्रह्माणी तुज तेव्हा । पालन करिसी विश्व जेव्हा । वैष्णवी ऐसे तुज म्हणती ॥ ५ ॥ कल्पांती संहार जेव्हा । रुद्राणी म्हणती तेव्हा । उत्पत्ती स्थिती लय कारणा । जगन्माया तुज म्हणती ।। ६ ।। महाविद्या महामाया । महामेधा महास्मृती । महामोहा महादेवी। महेश्वरी परमेश्वरी ।। ७ ।। ऐसी नामे अनंत । गुणत्रयाते विभाजीत । प्रकृती रूपे खेळवीत । सर्व जाणा विश्वाते ।। ८ ।। तुज म्हणती कालरात्री । महारात्री मोहरात्री | श्री विष्णूचे नेत्रांतरी । राहुनी निद्रिस्थ त्या केले ।। ९ ।। ॐ ऐम् हीम् श्रीम् क्लीम् परमेश्वरी स्वाहा । मनबुद्धि अगोचर पाहा । विश्वव्यापी विश्वेश्वरी हा । महामंत्र तुझा असे ।। १० ।। लज्जा तुष्टी पुष्टी शांती । क्षमा आणि सद्बुद्धी । आत्मस्वरूपाची जागृती । तुझिया कृपे होतसे ।। ११ ।। खड्ग शूल गदा चक्र । शंख बाण चाप घोर । करी दैत्यांचा संहार । अभय देई भक्तांते ।। १२ ।। करावया दैत्यांचा संहार । धरी रूप उग्र भयंकर । परी भक्ता लागी सुंदर । सौम्य श्यामल मूर्ती ती ।। १३ ।। शांत सौम्य सुंदर । रूप जिचे मनोहर । सदैव स्मित मुखावर । नित्य राहे जियेच्या ।। १४ ।। ऐशी तू परमेश्वरी । परात्पर अखिलेश्वरी । विश्वरूप विश्वेश्वरी । आदिशक्ती तुज नमो ॥। १५ ।। कैसे तुझे स्तवन । करू म्हणे ब्रह्मा आपण । जगत् पालक नारायण । त्यासी निद्रिस्थ त्वा केले ।। १६ ।। उत्पत्ती स्थिती लय जो करी । ऐसा जो श्रीहरी । त्यासी निद्रिस्थ करी । ऐसा महिमा जियेचा ।। १७ ।। ऐसी तू माहेश्वरी । सर्व देवतांची परमेश्वरी । कोण तुझी स्तुती करी । ऐसे सामर्थ्य कवणाचे ॥ १८ ॥ हे मधुकैटभ असुर । यांसी मोही सत्वर । नातरी हे भयंकर । उत्पात आता माजविती ।। १९ । । करी विष्णूसी जागृत । देई बुद्धी तयाप्रत । संहारावया दैत्यांप्रत । वंदन तुते करीतसे ।। २० ।।
।। स्वस्ति रात्री सूक्तम् ।। (ओवी संख्या २०)
॥ श्रीदेवी अथर्वशीर्ष ॥
सर्व देवता मिळोन । पुसती देवी लागोन । महादेवी तव स्वरूप पूर्ण । विशद आम्हा तू करी ॥ १ ॥ देवी म्हणे मी शून्य । निराकार निर्गुण । आदि अंत रहित पूर्ण । ब्रह्म सनातन मी असे ॥ २ ॥ प्रकृती मी पुरुष मी । आनंद मी अनानंद मी । विज्ञान मी अज्ञान मी । ऐसे जाणा रूप माझे ।। ३ ।। हे दृश्य जे चराचर । मीच नटले साचार । मजविण अणुमात्र । सृष्टी काही असेना ॥ ४ ॥ पूर्व पश्चिम दक्षिणोत्तर । ऊर्ध्व अधर दिशा समग्र । सर्वत्र मी साचार । भरोनी राहे सर्वदा ।। ५ ।। मीच एकादश रुद्र । अष्टवसु मी दिगंतर । विश्वदेव द्वादश आदित्य । मीच सारे नटलेसे ॥ ६ ॥ त्वष्टा, पूषा आणि सोम। ब्रह्मा विष्णू महेश जाण । प्रजापती, भग, मित्रावरूण । मीच सारे नटलेसे ।। ७ ।। अग्नि मी अश्विनीकुमार । त्रैलोक्यात करी संचार । संपूर्ण जगत् ईश्वर । हेची जाणा रूप माझे ॥ ८ ॥ ऐसे ऐकोनी वचन । सर्व देव करिती नमन । नमो देव्यै म्हणोन । वंदन करिती देवीसी ।। ९ ।। अग्निसम दैदीप्यमान । मंगलमयी तू परिपूर्ण । दुर्गा देवीते नमन । आम्ही सदा करीतसो ||१०|| दृष्टिआड राहोनी । विश्व चालवी गुप्तपणी । न कळे कोणा जिची करणी । त्या दुर्गेते नमितसो ।। ११ ।। असो राजा अथवा रंक । पंडित अथवा मूर्ख | सर्वांसी करी कर्मप्रवृत्त । त्या दुर्गेसी नमितसो ।। १२ ।। अगाध सत्ता जिची । उगे राहो नेदी कवणासी । कर्मी बांधी जीवांशी । त्या दुर्गेते नमितसो ।। १३।। तृणापासोनी ब्रह्मापर्यंत । भूचर, जलचर, खेचर । मानव आणि इतर । सर्वां कर्मी लावीतसे ॥। १४ ॥ प्राणरूप, चैतन्यरूप । आनंद कामधेनुरूप । अन्न बल स्वरूप देत । त्या दुर्गेते नमितसो ।। १५ ।। काळाचा करी नाश । म्हणोनी वेद स्तवित । शिवशक्ती ब्रह्मशक्ती ऐक्य । दुर्गे देवी नमोस्तुते ।। १६ ।। ॐ महालक्ष्मी च विद्महे । सर्व शक्त्यै च धीमहि । तन्नो देवी प्रचोदयात् ।। १७ ।। ऐसी महाशक्ती परात्पर । विश्वमोहिनी पाशांकुशधर । ऐसे म्हणोनी अमर । स्तवन करिती दुर्गेचे ।। १८ ।। क ए ई ल हीम् ह स क ह ल हीम् सकल व्हीम् । एषा असे महाविद्या । श्रीविद्या ब्रह्मविद्या । महात्रिपुरसुंदरी सद्या । प्रसन्न जाणा होतसे ।। १९ ।। ऐशा अंबेचे चिंतन । जे करिती मनापासोन । त्यांचे दुःख आणि दैन्य । दूर जाणा होतसे ।। २०।। हे दुर्गा दुर्गार्ति हारिणी । सदैव रक्षी आम्हा लागोनी । ऐसे म्हणोनी चरणी । देव वंदिते जाहले ।। २१ ।। हे संपूर्ण विश्व । श्रीदुर्गेचे स्वरूप होय । अष्टवसू इंद्र चंद्र सूर्य । दुर्गा जाणा निर्धारि ।। २२ ।। पापहारिणी देवी । सर्व सौभाग्यदायिनी । सर्व मंगल स्वरूपिणी । दुर्गा जाणा निश्चये ।। २३ ।। तिसी जाता शरण । होई परम कल्याण । ऐसे म्हणोनी देवगण । प्रणाम करिती देवीते ।। २४ ।। ‘ॐ’ हीम् ‘ॐ’ म्हणावा मंत्र । अथवा ‘हीम्’ मंत्राचा जप । यानेची कृपा साध्य होत । दुर्गा सांगे देवांते ।। २५ ।। ‘ॐ ऐम् हीम् क्लीम् चामुण्डायै विच्चे’ । आणखी मंत्र हा तुम्हा देते । सर्वार्थ याने साधते । दुर्गा म्हणे देवांसी ।। २६ ।। ऐकोनी देवीचे वचन । देवता संतोष पावोन । जय जय दुर्गे म्हणोनी । वंदन करिती तिजलागी ||२७|| आरुणी समान प्रभायुक्त । पाशांकुश उभयहस्त । वरद अभय मुद्रास्थित । मनोहर रूप दुर्गेचे ।। २८ ।। आरक्त वस्त्र नेसली । त्रिनेत्र चंद्रकोर भाळी । महादेवी करुणामयी । वंदन तुते करीतसे ॥ २९ ॥ नमितो तुते महादेवी । महाभय विनाशिनी । महासंकट हारिणी । दुर्गे देवी नमोस्तुते ।। ३० ।। ब्रह्मादिका न कळे पार । अजन्मा अनंत मनोहर । अलक्ष्या अज्ञेया सर्वत्र । एकली पाहा राहतसे ।। ३१ ।। एकली राहे म्हणोनी ‘एका’ । विश्वरूपिणी म्हणोनी ‘अनैका’ । सर्व मंत्रांतील मातृका । ऐसी पाहा देवी ती ।। ३२ ।। चिन्मय रूपा सर्वसाक्षिणी । शून्यातही शून्यसाक्षिणी । सर्व परतरम् पाही । ती ते दुर्गा म्हणतसो ।। ३३ ।। संसारार्णव तारक । दुराचार असुरनाशक । त्या दुर्गेसी शरणागत । होवोनी नमन करीतसे ।। ३४ ।। अथर्वशीर्ष स्तोत्र देवीचे । पठण करिता मनोवाचे । पंचदेवता स्तोत्राचे । पुण्यप्राप्त होतसे ।। ३५ ।। अष्टोत्तरशत पाठ । करिता पुण्य अद्भुत । सर्व संकटे टळत । कृपाप्रसादे दुर्गेच्या ।। ३६ ।। प्रात:काळी करिता पाठ । पाप त्यासी न लागत । रात्री करिता पाठ । अपार पुण्य मिळतसे ।। ३७ ।। मध्यरात्री करिता पाठ । वासिद्धी होतसे प्राप्त । मूर्ती सन्निध पाठ । प्राणप्रतिष्ठा होत ।। ३८ ।। अमृतसिद्धी पाहोनी । महादेवी सन्निधानी । करावा पाठ त्या दिनी । महामृत्यू ते जिंकावया ।। ३९।। ऐसे हे उपनिषद | देवी देवतांचा संवाद । ही गुप्त विद्या प्रकटत । ईश्वर भक्तांकारणे || 80 ||
।। स्वस्ति देवी अथर्वशीर्ष ।। (ओवी संख्या ४० )
यानंतर नवार्ण मंत्राचा १०८ वेळा जप करावा. शक्य असेल तर ‘न्यास’ करावेत.
नवार्ण मंत्र
ॐ ऐम् व्हीम् क्लीम् चामुण्डायै विच्चे’
॥ अथ दुर्गा सप्तशती ॥
।। अध्याय पहिला ।।
या प्रथम चरित्राते । ब्रह्मा ऋषी म्हणा वाचे । महाकाली देवतेचे । स्मरण करावे भक्तीने ।। १ ।। गायत्री छंद नंदा शक्ती । अग्नितत्त्व बीज रक्तदन्ती । ऋग्वेद स्वरूपस्थिती । महाकालीते स्मरावे ।। २ ।। ऐसा विनियोग म्हणोन । उदक भूमी सोडोन । प्रथम चरित्राचे पठण । करावे भक्तिभावाने ।। ३ ।। ब्रह्मयाचे स्तुतिकारण । महाकालीचे अवतरण । मधुकैटभाचे हनन । केले पाहा जियेने ।।४।। खड्ग चक्र गदा पाणि । धनुष्य, परीघ, शूल, बाण । दश हाती आयुधे घेवोन। युद्धा उभी ठाकली ।। ५ ।। दिव्य आभूषणांनी युक्त । त्रिनेत्री प्रकाश फाकत । नीलमणी सम चमकत । देहकान्ती जियेची ॥ ६ ॥ ऐसे करावे ध्यान । सुरू करावे ग्रंथपठण । महाकाली कृपे करोन। निर्विघ्न कार्य होतसे ।। ७ ।। मार्कण्डेय श्रोत्या लागोन । म्हणे ऐका सावधान । सूर्यपुत्र सावर्णी आख्यान । आठवा मनु ज्या म्हणती ।। ८ ।। स्वारोचिष मन्वंतर । सुरथ नृप महिवर । चैत्र कुलोत्पन्न वीर । पृथ्वीवरी राज्य करी ।। ९ ।। मातेपरी प्रजापालन । धर्म मार्गी सदा मन । कोलाविध्वंसी शत्रुगण । चालून आले तयावरी ।। १० ।। राव पराक्रमी थोर । परी युद्धात जाहली हार । मंत्री सेनानी समग्र । विरोधी त्यांसी जाहले ।। ११ ।। गेला सर्व प्रभाव । राजा झाला दीन मानव । अश्वावरी होऊनी स्वार। काननांतरी रिघाला ।। १२ ।। शिकारीचे करुनी निमित्त । राव काननी निघून जात । मेधा मुनी आश्रम पाहत । शांती अपार लाभतसे ।। १३ ।। मुनी करीतसे स्वागत । राजा होई स्वस्थ चित्त । काही काळ राही तेथे । शांत मन करावया ॥। १४ ।। ऐसे काही दिन जात। मन पुन्हा होई अशांत । म्हणे मी नृप असोन येथ । काननी येवोनी पडलो का ? ।। १५ ।। काय झाले असेल राज्याचे । काय झाले असेल द्रव्याचे । हाल काय प्रजेचे । झाले नकळे मजलागी ।। १६ ।। माझे भ्रष्ट सेवक । शत्रूते मिळोनी सम्यक । प्रजेसी देती दुःख । काय करावे कळेना ? || १७ || चिंता करी निरंतर । मन अस्वस्थ आणि अधीर । न राहे एक क्षण स्थिर । व्याकुळ जाणा होतसे ॥ १८ ॥ ऐसा राहे आश्रमात । तव एक दिन देखत। एक वैश्य चिंताग्रस्त । तये ठायी पातला ।। १९ ।। देखोनिया वैश्यासी । राजा विचारी तयासी । काय दुःख तुम्हांसी । चिंताग्रस्त दिसतसा ।। २० ।। ऐकोनी नृपाचा प्रश्न । वैश्य म्हणे तया लागोन । मी उत्तम कुलोत्पन्न । समाधी नाम मजलागी ।। २१ ।। होतो बहु धनवान । परी स्त्री- पुत्रे दिले हाकलोन । येथे आलो म्हणोन । शांती लाभाया कारणे ।। २२ ।। परी मन अशांत । स्त्री-पुत्राते चिंतित । काय असतील करीत । म्हणोनी चिंती मानसी || २३ || असतील ते सदाचारी। अथवा होतील दुराचारी । सुखी असती की कष्टी । म्हणोनी चिंता करीतसे ॥। २४ ।। हासोनी राजा म्हणत । जे तुजला हाकलीत । त्याज कारणे चिंता करीत । मूर्खत्व जाणा हे असे ।। २५ ।। वैश्य म्हणे आपले वचन । योग्य परी न राहे मन । स्त्री- पुत्राते आठवोन । सदा चिंता करीतसे ॥ २६ ॥ धन लुटाया कारण। मज दिधले हाकलोन । परी चित्त प्रेममग्न । होऊनी चिंता करीतसे ॥ २७ ॥ ऐसे का आहे होत । हे न कळे मजप्रत । कवण माया अद्भुत । खेळ सारा हा रचे ।। २८ ।। ऐसा विचार करीत । सुरथ राजा आणि वैश्य । उभय मुनीते वंदित । सांगती सारे तयासी ।। २९ ।। राजा म्हणे मुनीसी । हे नकळे मानसी । ही काय माया तू जाणसी । सांगा कृपा करोनिया ।। ३० ।। मी राज्यभ्रष्ट दुःखित । वैश्य गृहभ्रष्ट दुःखित । तरीही चिंतितो मनात । कल्याण आम्ही स्वजनांचे ।। ३१ ।। ही महामाया काय । विवेकशून्य मती होय । कोठोनी निर्माण होय । कृपा करोनी सांगावे ।। ३२ ।। ऋषी म्हणे भगवती । विश्वरचना करे ती । समस्त प्राणिमात्रांची गती । तिच्या आधीन राहतसे ।। ३३ ।। पक्षिणी प्रभाती उडत । सायंकाळी मागे फिरत । कोण त्यांसी प्रेरणा देत । लीला महामायेची ।। ३४ ।। गाय, बैल, अश्व, श्वान । न जाती गृहा सोडोन । आपुले उदर भरोन । पुन्हा येती माघारा ।। ३५ ।। काही प्राणी दिवांध । काही असती रातांध । काही दिन – रात्री पाहत । ऐसे विविध प्राणी ते ।। ३६ ।। ऐसे विविध प्राणी । तेही गेले मोहोनी । पिपिलिका कण देखोन । भक्षावया धावतसे ।। ३७ ।। धावे गज पोटासाठी । धावे व्याघ्र मृगापाठी । मृग धावे तृणापाठी । महामायेच्या प्रभावाने ।। ३८ ।। ऐसे जीव धावत । उदर भरण्यासाठी पळत । त्यातची संसार करीत । पाळती आपुल्या पिल्लांसी ।। ३९ ।। उदरभरण आणि संतान पालन | हेची जीव करिती जाण । मनुष्य काय याहून । अधिक जाणा करीतसे ? ॥ ४० ॥ परी मनुष्य मूर्ख अधिक । प्रतिफळ सदैव अपेक्षित । महामायेसी नोळखित । म्हणोनी दुःखी होतसे ।। ४१ ।। ते महामाया भगवती । श्री विष्णूची निद्रास्थिती । सर्व जीव मोह पावती । तिच्या प्रभावे करोनिया ।। ४२ ।। पंडित आणि महाज्ञानी । ऐशा जना पाहोनी । विविध प्रकारे मोहवूनी । ठेवी महामाया ती ।। ४३ ।। त्या महामाया भगवतीने । विश्व रचिले हे सारे । तिच्या आधीन राहिले । जगत् संपूर्ण सर्वदा ॥ ४४ ॥ ती सर्व ईश्वरांची परमेश्वरी । परा विद्या अखिलेश्वरी । बंधन मोक्षा सर्वेश्वरी । सर्व तीच करीतसे ॥। ४५ ।। ती होता प्रसन्न । सायुज्यमुक्तीचे वरदान । भक्ता लागी देवोन । मुक्त त्यासी करीतसे ।। ४६ ।। राजा म्हणे ऋषी लागोन । अशी ही महामाया कोण ? । केव्हा झाली उत्पन्न | चरित्र सांगा आम्हासी ।। ४७ ।। कैसा तिचा प्रभाव । कैसे स्वरूप वैभव । महर्षी तुम्ही ज्ञानार्णव । सर्व सांगा मजलागी ।। ४८ ।। ऋषी म्हणती नृपा ऐक । आदि अनादि नित्य एक । संपूर्ण जगत् स्वरूप देख । त्या दुर्गेचे जाण तू ।। ४९ ।। परी कार्या कारण । विविध रूपे घेवोन । स्वये अजन्मा असोन । प्रकट जाणा होतसे ।। ५० ।। देवकार्या कारण । दुर्गा करी रूप धारण । प्रकटली महादेवी म्हणोन । जयजयकार देव करिताती ।। ५१ ।। कल्पांताचे अंतकाळी । जलमय होते विश्व सकळी । महाविष्णू शेषशय्या स्थळी । निद्रिस्थ होते जाहले ।। ५२ ।। योगनिद्रेत नारायण । शेषावरी होते पहुडोन । नाभिकमली ब्रह्मा आपण । स्वानंदी निमग्न होते ते ।। ५३ ।। तव विष्णूच्या कर्णमळातून । असुर निर्माण झाले दोन । मधु कैटभ म्हणोन । विख्यात झाले त्रिभुवनी ॥ ५४ ॥ भयंकर गर्जना करीत । असुर ब्रह्मदेवावरी धावत । ते पाहोनी भयभीत । झाला पाहा तेधवा ।। ५५ ।। करण्या विष्णूसी जागृत । योगनिद्रेचे स्तवन करीत । श्रीहरी नेत्रामाजी राहत । होती तेव्हा महामाया ।। ५६ ।। ॐ विश्वेश्वरी जगत्धात्री । स्थिती संहारकारिणी । श्री विष्णूची मोहिनी । तेजस्विनी तुज नमो ॥। ५७ ।। तू स्वाहा तू स्वधा नित्या । तू वषटकार स्वरात्मिका । सुधा अक्षर तू नित्या । मात्रात्मिका तुज नमो ॥। ५८।। अर्धमात्रेत स्थित । जी शक्ती अतिरिक्त । संध्या सावित्री आरक्त । जगत् जननी तुज नमो ।। ५९ ।। करीसी विश्वासी धारण । करीसी विश्वाचे पालन । अंती नाश संपूर्ण । या विश्वाचा करीसी तू ॥ ६० ॥ उत्पन्न करीसी विश्व जेव्हा । म्हणती ब्रह्माणी तुज तेव्हा । पालन करीसी विश्व जेव्हा । वैष्णवी ऐसे तुज म्हणती ।। ६१ ।। कल्पान्ती संहार जेव्हा । रुद्राणी म्हणती तेव्हा । उत्पत्ती स्थिती लया कारणा । जगन्माया तुज म्हणती ।। ६२ ।। महाविद्या महामाया । महामेधा महास्मृती । महामोहा महादेवी । महेश्वरी परमेश्वरी ।। ६३ ।। ऐसी नामे अनंत । गुणत्रयाते विभाजीत । प्रकृती रुपे खेळवीत । सर्व जाणा विश्वाते ।। ६४ ।। तुज म्हणती कालरात्री । महारात्री मोहरात्री । श्रीविष्णूचे नेत्रांतरी । राहूनी निद्रिस्थ त्या केले ।। ६५ ।। ॐ ऐम् हीम् श्रीम् क्लीम् परमेश्वरी स्वाहा । मन बुद्धीते अगोचरी पाहा । विश्वव्यापी विश्वेश्वरी हा । महामंत्र तुझा असे ।। ६६ ।। लज्जा तुष्टी पुष्टी शांती । क्षमा सद्बुद्धी आणि धृती । आत्मस्वरूपाची जागृती । तुझिया कृपे होतसे ॥ ६७ ॥ खड्ग शूल गदा चक्र । शंख बाण चाप घोर । करी दैत्यांचा संहार । अभय देई भक्ताते ।। ६८ ।। करावया दैत्यांचा संहार । धरी रूप उग्र भयंकर । परी भक्तालागी सुंदर । सौम्य श्यामल मूर्ती ती ।। ६९ ।। शांत सौम्य सुंदर । रूप जिचे मनोहर । सदैव स्मित मुखावर । नित्य राहे जियेच्या ॥ ७० ॥ ऐसी तू परमेश्वरी । परात्पर अखिलेश्वरी । विश्वरूप विश्वेश्वरी । आदिशक्ती तुज नमो ॥ ७१ ॥ कैसे तुझे स्तवन । करू म्हणे ब्रह्मा आपण । जगत् पालक नारायण । त्यांसी निद्रिस्थ त्वा केले ।। ७२ ।। उत्पत्ती स्थिती लय जो करी । ऐसा जो श्रीहरी । त्यासी निद्रिस्थ करी । ऐसा महिमा जियेचा ।। ७३ ।। ऐशी तू माहेश्वरी । सर्व देवतांची परमेश्वरी । कोण तुझी स्तुती करी । ऐसे सामर्थ्य कवणाचे ।। ७४ ।। हे मधु कैटभ असुर । यांसी मोही सत्वर । नातरी हे भयंकर । उत्पात आता माजविती ।। ७५ ।। करी विष्णूसी जागृत । देई बुद्धी तयाप्रत । संहारावया दैत्याप्रत । वंदन तुते करीतसे ॥७६॥ ब्रह्मदेवाचे स्तवन । ऐकोनी योगनिद्रा प्रसन्न । नेत्र मुख नासिक हृदय सोडून । समोर उभी ठाकतसे ॥७७॥ श्रीविष्णू देह सोडून । योगनिद्रा जाई निघून । जगत् स्वामी जनार्दन । जागृत होई तेधवा ।। ७८ ।। तव देखे मधु कैटभ । ब्रह्मयासी खावया जात । त्यासवे युद्ध करीत । महाविष्णू तेधवा ।। ७९ ।। पाच सहस्त्र वर्षे दारुण । चाले तेथे रणकंदन । अंती महामाया मोहून । त्यांची बुद्धी टाकीतसे ।। ८० ।। असुर होऊनी मोहग्रस्त । श्री विष्णूते तव म्हणत । तुझी वीरता देखत । प्रसन्न आम्ही झालोसे ।। ८१ ।। आम्ही झालो प्रसन्न । माग विष्णू वरदान | विष्णू म्हणे तुम्ही मरण । पावा माझ्या हस्ताने ॥ ८२ ॥ पाहोनी फसलो आपण । दैत्य झाले चिंतामग्न । सर्वत्र जल पाहोन । वदते झाले तेधवा ।। ८३ ।। जेथे नाही जलस्थान | कोरडी जागा पाहोन । मारी आम्हा लागोन । आम्ही मरू निश्चये ।। ८४ ।। ऐसे ऐकता वचन । विराट रूप करी धारण । जांघे वरी ठेवोन मान । चक्रे त्यासी वधियेले ।। ८५ ।। दोन्ही दैत्यांसी ऐसेपरी । विष्णू सुदर्शन चक्रे मारी । महामायेचा अवधारी । प्रभाव जाणा असे हा ।।८६।। ऐसेपरी महामाया । ब्रह्मदेवा कारणा । प्रकट झाली अनुपम्या । तिचा महिमा सांगतो ।। ८७।। मधु-कैटभ दैत्यवध नाम । ऐसे अध्याय नामाभिधान । पठणे मनोरथ पूर्ण । होतील जाणा भक्तांचे ।। ८८ ।। मार्कण्डेय पुराण | सावर्णिक मन्वंतर जाण । दुर्गा सप्तशती देवी माहात्म्य । प्रथम अध्याय गोड हा ॥ ८९ ॥
।। स्वस्ति दुर्गा सप्तशती अध्याय पहिला ।। (ओवी संख्या ८९ )
।। अध्याय दुसरा ।।
श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः | श्री गुरुभ्यो नमः । ॐ दुम् दुर्गायै नमः । ॐ ऐम् हीम् क्लीम् चामुण्डायै विच्चे । या मध्यम चरित्रासी । भगवान् विष्णू असे ऋषी । महालक्ष्मी देवता परियेसी । उष्णिक छंद असे जाणा ॥ १ ॥ शाकंभरी शक्ती दुर्गा बीज । वायुतत्त्व यजुर्वेद । श्री महालक्ष्मी प्रीत्यर्थ । जपे विनियोगा म्हणावे ॥ २ ॥ कमलासनी बैसोन । करी दारिद्याचे हनन विविध आयुधे घेवोन । दैत्य हनन तीच करी ॥ ३ ॥ ऐसी महालक्ष्मी प्रसन्न । करावे तिचे नित्य ध्यान । सुख शांती समाधान । सदैव लाभे भक्तासी || ४ || ऋषी म्हणती नृपासी । पूर्वी देव दैत्यासी । युद्ध जाहले असम साहसी । शतवर्षे संग्राम जाहला ।। ५ ।। महिषासुर दैत्याधिपती । इंद्र देवांचा अधिपती । रणांगणी पहा भिडती । आवेशाने लढती ते ।। ६ ।। युद्धा अंती देवगण । गेले पाहा पळोन । असुर विजयी होवोन । स्वर्गी जाऊनी बैसला ।। ७ ।। ब्रह्मदेवासी पुढे करोन । इंद्र समस्त देवगण । जाती हरिहर स्थान । कथा आपुली सांगावया ॥ ८ ॥ हरिहरांसी देव म्हणती । महिषासुर महाख्याती । झाला स्वर्गाचा अधिपती । आम्हासी त्याने हरविले ।। ९ ।। इंद्र, सूर्य, अग्नि देव । वायू, चंद्र, वरुण देव । यम तथा अन्य देव । सर्वां त्याने हरविले ।। १० ।। सर्वां पराजित करोन । घेतले अधिकार हिरोन । दिले आम्हा हाकलोन । म्हणोनी आलो सांगावया ।। ११ ।। गेले आमुचे देवत्व । मनुष्यापरी आहो हिंडत । आम्ही आपुले शरणागत । सांगा उपाय आम्हासी ।। १२ ।। कैसे वधावे दैत्यासी । हे सांगावे आम्हासी । म्हणोनी देव हरिहरासी । विनविते जाहले तेधवा ।। १३ ।। ऐकोनी देवांचे वचन । हरिहर होती कोपायमान । भृकुटी तेढी करोन । शिव क्रोधे पाहतसे ।। १४ ।। महाविष्णूच्या मुखातून । तेज बाहेर येई महान । तैसेची इंद्रादि देहातून । तेज बाहेर येतसे ।। १५ ।। ब्रह्मा, विष्णू, रूद्र । अग्नि, वायू, वरुणदेव । यम, अश्विनीकुमार, इंद्र । तेज आपुले सोडिती ।। १६ ।। या सर्वांच्या तेजातून । होई महातेजपुंज निर्माण । दाही दिशा उजळोन । जाती पाहा तेधवा ।। १७ ।। त्या तेजामधून । दुर्गा होतसे निर्माण । त्रैलोक्य जाई दिपोन । दुर्गा तेजे तेधवा ॥१८ ।। शिवतेजे मुखकमल । यमतेजे केस कोमल । विष्णुतेजे भुजा प्रबल । धारण केले देवीने ॥१९॥ चंद्रतेजे दोन्ही स्तन | इंद्रतेजे कटिप्रदेश । वरुणतेजे जांघ । धारण केले दुर्गेने ।। २० ।। ब्रह्मतेजे दोन्ही चरण । पृथ्वीतेजे नितंब । सूर्यतेजे पादांगुलीपूर्ण । धारण केले दुर्गे ।। २१ ।। वसूतेजे हस्तांगुली । कुबेरतेजे नासिका भाळी । अग्नितेजे त्रिनेत्रकमली । धारण केले दुर्गेने ॥ २२ ॥ प्रजापतीतेजे दंतपंक्ती । संध्यातेजे भृकुटी । वायूतेजे कर्णद्वयी । धारण केले दुर्गेने ।। २३ ।। सर्व देवांचे तेजामधून । दुर्गा झाली निर्माण । करावया जगत् कल्याण । तेज साकार होतसे ।। २४ ।। पाहुनी दुर्गा साकार | प्रसन्न झाले देव सर्व । आपुले शस्त्र-अस्त्र देत । देवीलागी तेधवा ।। २५ ।। त्रिशूल देई शंकर । विष्णू सुदर्शनचक्र । वरुणे दिव्य शंख । देवीलागी अर्पिला ।। २६ ।। शक्ती देई वैश्वानर । वायू देई बाण तुणीर । दिव्य धनुष्य प्रदान | देवी लागी अर्पिले ।। २७ ।। दोन भाते वायू देत । ज्याते अक्षय भाते म्हणत । बाण कधी न संपत । ऐसे दिव्य भाते ते ।। २८ ।। ऐरावतावरील घंटा आणि वज्र । ऐसे स्वये देई इंद्र । यमराज कालदंड । देतसे दुर्गा देवीते ।। २९ ।। प्रजापती स्फटिकमाला । पाश वरुणाने दिला । कमंडलू ब्रह्मदेवे अर्पिला । दुर्गेलागी तेधवा ।। ३० ।। रोमरोमांत दिवाकर । आपुले तेज भरे समग्र । महाकाल ढाल तलवार । देतसे दुर्गा देवी ।। ३१ ।। कदा न होती जीर्ण । ऐसी वस्त्रे दोन । तैसेचि माला आभूषण । दिधले क्षीरसागराने ।। ३२ ।। दिव्य चूडामणी नुपूर । कुण्डल कंकण केयूर । रत्नमुद्रिका दिव्य अर्धचंद्र । दिधले क्षीरसागराने ।। ३३ ।। परशू अनेक दिव्यास्त्र । अक्षयमाला अभेद्य कवच । अन्य अनेक शस्त्र- अस्त्र । दिधली विश्वकर्म्याने ।। ३४ ।। जलधी देई कमल सुंदर । वस्त्रे रत्न अलंकार । आपापल्या परीने सर्व । सेवा करिती देवीची ।। ३५ ।। विविध प्रकारची रत्ने । शेषनाग दुर्गेसी देत । वनराज सिंह भेट देत । हिमालय पर्वत दुर्गेसी || ३६ || मधुपात्र देई कुबेर । पृथ्वी देई नागहार । ऐसे नाना अलंकार । देव देती दुर्गेते ।। ३७ ।। ऐसे परी सजवून । देव करिती वंदन । आणि सर्वही मिळोन । जयजयकारे गर्जती ।। ३८।। दुर्गेने होऊन प्रसन्न । दिधले सर्वां आशीर्वचन । दीर्घ गर्जना करोन । सामर्थ्य आपुले दाविले ||३९|| त्या गर्जने करोन । पृथ्वी होई कंपायमान । समुद्री उठे तुफान । ऐसा आकांत वर्तला ।। ४० ।। जयजय दुर्गे सिंहवाहिनी । दुःख निवारी प्रकट भवानी । देव ऋषी आणि मुनी । स्तव लागले तेधवा ।। ४१ ।। महिषासुर होवोनी क्रोधित । म्हणे संकट अकस्मात । कोठोनी उद्भवले येथ । कैसा नाद हा असे ।। ४२ ।। सैन्याते करी सुसज्जित । कवचे शरीरी चढवीत । शस्त्रे – अस्त्रे हाती घेत । नाद लक्षोनी निघाले ।। ४३ ।। हिमालयी जाऊनी पाहत । तव दुर्गेसी देखत । त्रैलोक्य तेजे दिपत । ऐसे रूप तियेचे ।। ४४ ।। पदतळी पृथ्वीशी दाबीत । मुकुटे आकाश भेदीत । धनुष्य टणत्कारे कंपित । सप्त पाताळ होतसे ।। ४५ ।। स्वरूपे दशदिशा व्यापित । शस्त्रास्त्रे हात अनंत । त्या नादे कंपित । धरणी जाणा होतसे ।। ४६ ।। पाहोनी दैत्य सैन्य । देवी करी गर्जन । युद्ध महादारुण । सुरू झाले तेधवा ।। ४७ ।। सेनापती चिक्षुर । सैन्याते देतसे धीर । तैसेची दैत्य चामर । लढो लागे देवीसी ॥ ४८ ॥ महिषासुर सेनानी चिक्षुर । अन्य बलाढ्य असुर । सवे घेऊनी सैन्यसंभार । चालोनी जाती देवीवरी ।। ४९ ।। बलाढ्य दैत्य चामर । सैन्य त्याचे साठ सहस्त्र । उदग्र नामे असुर । भिडे पाहा देवीसी ।। ५० ।। एक कोटी रथांसहित । महाहनु नामे दैत्य । देवीसी आव्हान देत । युद्धा लागी सरसावे ।। ५१ ।। पाच कोटी रथ घेवोन । युद्ध करी दैत्य असिलोम । बाष्कळ दैत्य येवोन । त्यासी मिळे तेधवा ।। ५२ ।। साठ लक्ष रथांसहित । बाष्कळ देवीसी भिडत । चहुबाजूंनी घेरीत । दैत्य पाहा देवीसी ।। ५३ ।। अनेक दल हत्तीवरी । अनेक आरुढोनी रथावरी । कोट्यावधी अश्वावरी । बैसोनी युद्ध करताती ॥ ५४ ॥ बिडाल नाम दैत्य । पंच अरब सैन्यासहित । सहस्त्रावरी महादैत्य । युद्ध करिती देवीसी ।। ५५ ।। स्वये महिषासुर आपण । मध्यभागी उभा राहोन । पाहे रणकंदन । मारा हाणा म्हणतसे ॥५६ ।। विराट रूप धरोनी । सहस्त्रावधी हस्तांनी । दुर्गेने शरसंधानी । असुर मारले तेधवा ।। ५७ ।। भगवती दुर्गा परमेश्वरी । देवांसाठी युद्ध करी । दुष्ट असुरांते मारी । जगत् कल्याण करावया ।। ५८ ।। देवीचे श्वासागणिक । वीर उत्पन्न होती अनेक । असुरांते ठार करीत । ऐसा महिमा दुर्गेचा ।। ५९ ।। दुर्गा देवीचे सिंहवाहन। दैत्यांमाजी संचरोन । असंख्य दैत्यांते फाडोन । टाकीले पाहा सिंहाने ।। ६० ।। देवी निःश्वासे उत्पन्न। सहस्त्र गण करिती कंदन । नगारे शंख वाजवोन । उत्साहित करिती देवीला ।। ६१ ।। जैसे तृणासी लागता अग्नि । भस्म होय एक क्षणी । तैसे सर्व असुर जाणी । मारिले पाहा देवीने ।। ६२ ।। पाशे कित्येका बांधले । किती एकांचे तुकडे केले । गदेने शिर फोडिले । ऐसे जाहले तेथ देखा ।। ६३ ।। मुसळ प्रहारे कित्येक । रक्त वमन करिती तेथ । शूलप्रहारे ऊर फुटत । किती दैत्यांचे तेधवा ।। ६४ ।। शरसंधानी कित्येकांचे । हात पाय मान कापले । ऐशा परी किती एक पडले । मरोनी जाणा भूवरी ।। ६५ ।। सहस्त्रावधी कबंध । रणामाजी करिती नृत्य । देवीते ललकारीत । मारो तू ते म्हणोनिया ।। ६६ ।। जैसे ‘तृण कोठारासी । अग्नि लागता परीयेसी । नष्ट होई क्षणमात्रेसी । तैसे तेथे जाहले ।। ६७ ।। दुर्गा एका क्षणात । कोट्यावधी असुर मारीत । भूमी रक्ताने भिजत । नद्या वाहती रक्ताच्या ॥ ६८ ।। सिंहही पराक्रम करी । अनेक असुरांते मारी । देवी गणांनी तेथवरी । महायुद्ध केले देखा ।। ६९ ।। उभे राहूनी गगनात । देवगण पुष्पे वर्षत । ‘उदयोस्तु’ अंबे म्हणत । जयजयकार ऋषी करिती ।। ७० ।। मार्कण्डेय पुराण । सावर्णिक मन्वंतर जाण । देवी माहात्म्य महिषवधनाम । द्वितीयोध्याय गोड हा ।। ७१ ।
।। स्वस्ति दुर्गा सप्तशती अध्याय दुसरा ॥ (ओवी संख्या ७१)
|| अध्याय तिसरा ॥
।। ध्यानम् ।।
श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नमः । ॐ ऐम् हीम् क्लीम् चामुण्डायै विच्चे । ॐ दुम् दुर्गायै नमः । उदित सूर्यासमान । दुर्गेची अंगकांती महान । आरक्त वस्त्र नेसोन । उभी समोर राहतसे ॥१॥ रक्तचंदन स्तनी लेपिले । मुंडमाळ गळा घातली । हाती जपमाळ घेतली । ऐसे रूप दावीतसे ॥ २ ॥ तीन नेत्र चंद्रकोर । भाळी मुकुट सुंदर । कमलासनी विराजित । अभयमुद्रा करीतसे ।। ३ ।। ध्यानी ऐसे पाहोन । केले देवीते वंदन । ऋषी भक्ता लागोन । कथा सांगती देवीची ॥ ४ ॥ पाहोन दैत्य सैन्याचे हनन । दैत्य सेनापती चिक्षुर आपण । महाक्रोधे पुढे येवोन । अंबेसी युद्ध करीतसे ॥। ५ ।। जैसे मेरू पर्वतावर । जलधारा वर्षती अपार । बाणवर्षा तो असुर । करू लागे तेधवा ।। ६।। श्रीदेवीने अनायास । छेदिले बाण समूहास । अश्वसारथी ध्वज धनुष्य । कापोन तिने काढिले ।। ७ ।। घेवोनी ढाल तलवार । दैत्य धावे देवीवर । सिंह मस्तकी करोनी मार । देवीवरी धावे तो ॥ ८ ॥ देवीच्या वाम बाहीवर । दैत्य मारी तलवार । तव ती तुटोनी भूमीवर । पडे पाहा तेधवा ।। ९ ।। मग शूल घेवोनी करी । क्रोधे फेकी दुर्गेवरी । अति वेगाने देवीवरी । शूल येवो लागला ।।१०।। देवीनेही एक शूल । फेकीला शूल देखोन । दैत्य शूलाचे तुकडे होऊन । भूमीवर पडले ते ।। ११ ।। चिक्षुर महादैत्य । त्याचेही तुकडे होत । देवी शूलाने अद्भुत । सामर्थ्य तेव्हा दाविले ।। १२ ।। पाहता सेनापती मृत । चामर दैत्य धावत । गजावरी आरूढत । युद्धालागी सरसावे ।। १३ ।। शक्ती सोडी देवीवरी । हुंकारे देवी निष्प्रभ करी । शक्ती पडे भूमीवरी । देखोनी क्रोध दैत्याते ।। १४ ।। क्रोधे शूल फेकी दैत्य । देवी बाणे तो तोडीत । सिंह गजावरी चढत । मारावया दैत्याते ।। १५ ।। सिंहे बाही पकडोन । दैत्यासी भूमी पाडोन । पंजे त्यासी मारोन । शिर धड केले बाजूला ।। १६ ।। उदग्र तैसाची मेला । देवीने त्यासी मारिला । करालही तैसाची मेला । देवी हस्ते त्या रणी ।। १७ ।। उद्धत नामे दैत्य । गदा प्रहारे देवी मारत । बाष्कळ ताम्र अंधक । मारले पाहा देवीने ||१८|| दुर्गा भगवती परमेश्वरी । दैत्या मारी ऐशापरी । शांती यावी पृथ्वीवरी । देवकार्य करीतसे ॥१९॥ उग्रास्य, उग्रवीर्य, महाहनु । आदि दैत्यांचे हनन । त्रिशूले देवीने करोन । भूमिभार उतरला ॥ २० ॥ दुर्धर, दुर्मुख बिडाल । ऐसे कित्येक दैत्यवीर । सर्वांसी यमनगर । पाठविले त्या देवीने ।। २१ ।। पाहोनी सेनेचा संहार । महिषरूप धरी महिषासुर । देवी सेनेत हाहा:कार । उडवीतसे तेधवा ॥ २२ ॥ कित्येका शिंगे मारिले । किती एका खुरे तुडविले । निःश्वासे पाहा उडविले । दूर किती एकासी ॥ २३ ॥ शिंगांनी उचलोन पर्वत । देवी सैन्यावरी फेकीत । वृक्ष, पाषाण पडो लागत । देवी सैन्यावरी तेधवा ।। २४ ।। महिषासुरे महापराक्रम । केला पाहा दारुण । त्याच्या निःश्वासे पाषाण । गगनी उडोनी जाती ते ।। २५ ।। ते मागोनी परत । देवी सैन्यावरी पडत । अपार हानी होत । देवी सेनेची त्या वेळी ॥ २६ ॥ हे पाहोनी क्रोधित । होई दुर्गा देवी तेथ । दैत्य आक्रमण करीत । देवी आणि सिंहावरी ।। २७ ।। दुर्गा महाचण्डिका । पाशे त्यासी बांधे देखा । महिषरूप त्यागोनी देखा । सिंहरूप धरीतसे ।। २८ ।। महिषे सिंहाचे रूप धरिले। दुर्गेने त्यासी पकडिले । त्याने रूप पालटिले । पुरुषरूप धरिले देखा ।। २९ ।। देवीने धरिता त्यासी । गजरूप धरी वेगेसी । सोंडेने मारी सिंहासी । चित्कार दीर्घ करोनिया ।। ३० ।। देवी तव अकस्मात । सोंड कापूनी टाकीत । पुन्हा महिषरूप घेत । महादैत्य वा ।। ३१ ।। महिषरूप घेवोन । करी देवी सैन्याते हैराण । चण्डिका हासे खदखदोन । मधुपानाते करोनिया ।। ३२ ।। शिंगाने पर्वत उचलोनी । देई देवी सैन्यावरी फेकोनी । देवी बाण समूहानी । चूर्ण केले तेधवा ।। ३३ ।। हासोनी देवी म्हणत । जोवरी मी मधु पीत । तोवरी गर्जना करीत । हर्ष करोन घेई तू ॥ ३४ ॥ तुझा मृत्यू मम हाती । होईल काही क्षणांती । शीघ्र देवता गर्जती । पाहा आता निर्धारि ।। ३५ ।। ऐसे म्हणोनी जगदंबा । उडी घेई तेधवा । महादैत्याते आडवा । पाडिला पाहा देवीने ।। ३६ ।। लत्ताप्रहार करोनी । दैत्य पाडिला धरणी । शूले कंठ वेधोनी । टाकिला पाहा देवीने ।। ३७ ।। महिषाचे कापिता शिर । राक्षस येई बाहेर । हाती घेवोनी तलवार । शिर त्याचे छेदिले ।। ३८ ।। ऐशा परी महिषासुर । मारिला देवीने असुर । दैत्य सैन्य हाहाःकार । करीत पळोनी गेले ते ।। ३९ ।। प्रसन्न होऊनी देवगण । पुष्प वर्षाव करिती जाण । ऋषी म्हणे नृपा लागोन । चरित्र ऐसे देवीचे ॥ ४० ॥ देवता, ऋषी, गण, गंधर्व । दुर्गेचे स्तवन करीत । अप्सरा नाचू लागत । हर्षभराने तेधवा ॥ ४१ ॥ मार्कण्डेय पुराणांतर्गत । सावर्णिक मन्वंतरागत । देवी माहात्म्य महिषासुरवध नाम । तृतीयोध्यायः ।। ४२ ।।
।। स्वस्ति दुर्गा सप्तशती अध्याय तिसरा || (ओवी संख्या ४२)
॥ अध्याय चौथा ॥
श्री गणेशाय नमः । ॐ दुम् दुर्गायै नमः । ॐ ऐम् हीम् श्रीम् क्लीम् परमेश्वरी स्वाहा । महासिद्धी व्हावया प्राप्त । साधक जिची सेवा करीत । देवी देवता परिवृत्त । जय जय दुर्गे नमोस्तुते ॥ १ ॥ शंख, चक्र, कृपाण । त्रिशूल त्रिनेत्र धारण । तेजस्विनी सिंहवाहन । जय जय दुर्गे नमोस्तुते ॥ २ ॥ असुरांसी करी ताडन । भक्ता देई वरदान । स्मरताची येई धावोन । जय जय दुर्गे नमोस्तुते ।। ३ ।। ऐसे परी ध्यान करोन । ऋषी म्हणे नृपा लागोन । ऐके लक्ष देवोन । पुढील आख्यान देवीचे ।। ४ ।। सेनेसहित महिषासुर । झाला पाहोन संहार । देवता झुकवोनी शिर । स्तवन करिती तेधवा ।। ५।। अत्यंत आनंदभरीत । देवता होती रोमांचित । स्तुती करो लागत । जगदंबेची तेधवा ।। ६ ।। सर्व देवतांची शक्ती । हेची तुझी स्वरूपस्थिती । ऋषी देवता अर्चिती । जय जय दुर्गे नमोस्तुते ॥ ७ ॥ तुझिया शक्तीचे वर्णन । करू न शके ब्रह्मा आपण । शेषनाग, महादेव भगवान् । वर्णन करू शकेना ॥ ८ ॥ सर्व जगाचे पालन । संपूर्ण जगाचे कल्याण । सर्व अशुभांचा नाश पूर्ण । दुर्गा चंडिका करीतसे ॥ ९ ।। हे महादेवी जगदंबा । निवारी सर्व आपदा । सर्व संपदा । सद्भक्तासी नित्य तू ।। १० ।। पुण्यात्म्याचे घरी । लक्ष्मीरूपे पाणी भरी । सद्गुण दैवी संपत्ती । लाभे तुझिया सत्तेने ।। ११ ।। ज्याचे शुद्ध अंत:करण । श्रद्धा, सद्बुद्धी, सुमन । लज्जा, विनय, सद्गुण । रूपे राहसी देवी तू ।। १२ ।। जे पापी मनुष्य असत । तुझ्या कृपेसी वंचित । दारिद्य आणि मूढग्रस्त । होऊनी राहती अवधारा ।। १३ ।। भगवती दुर्गे नमस्कार । तुते करितो वारंवार । कृपा सदैव आम्हावर। याची परी ठेवी तू ।। १४ ।। येथून विश्वाचे पालन । दुर्गे करावे आपण । ऐसे देवदेवता म्हणोन । विश्व अर्पिती देवीसी ।। १५ ।। अचिन्त्य दुर्गे तुझे स्वरूप । अतुल्य पराक्रम दावीत । तुझे चरित्र अद्भुत । कैसे आम्ही वर्णावे ।। १६ ।। तू उत्पत्तीचे कारण । सत्त्व रज तमोगुण । परी तू गुणातीत पूर्ण । संसर्गरहित तू अससी ।। १७ ।। आदिभूत अव्याकृत प्रकृती । तू जगताची आदिशक्ती। शिव विष्णुही न जाणती । ऐसा महिमा देवी तुझा ।। १८ ।। स्वाहा पल्लव उच्चारिता। सर्व देवा तृप्तता । लाभे ती स्वाहा निश्चिता । दुर्गे तूचि अससी गे ।। १९ ।। स्वधा पल्लव उच्चारिता। पितरा लाधे तृप्तता । ती स्वधा शक्ती निश्चिता । दुर्गे तूचि अससी गे ॥ २० ॥ मोक्षप्राप्तीचे साधन । ती पराविद्या तूचि जाण । जितेंद्रिय मुनी आचरण । करिती साधन तेचि तू ।। २१ ।। तू ऋग्वेद तू यजुर्वेद । तू सामवेद षड् ऐश्वर्ययुक्त | आत्मज्ञान मेधायुक्त । दुर्गे तूची अससी ।। २२ ।। भवसागर तारिणी नौका । दुर्गा तूचि असे देखा । तू कृपा करिता देखा । मोक्ष आपैसा मिळतसे ।। २३ ।। विष्णू हृदयी तू लक्ष्मी । शिव हृदयी तू गौरी । सायुज्य मुक्तीची स्वामिनी । दुर्गे तूचि अससी गे ।। २४ ।। तुझे मुखकमल सुंदर । मंदहास्य मुखावर । ऐसे असोनी प्रहार । कैसा केला दैत्याने ।। २५ ।। याचे आश्चर्य वाटत । ऐसे देवता म्हणत । एकमेकांते म्हणत । कैसे साहस असुरांचे ।।२६।। देवी तू जेव्हा क्रोधित । होऊनी भृकुटी वक्र करीत । तेव्हा आम्हीही भयभीत । होतो पाहा जाहलो ।। २७ ।। परी हेही नवल । दैत्य जीवीत काही काळ । राहोनी समर प्रबल । मांडिले त्याने तुज सवे ।। २८ ।। देवी व्हावे प्रसन्न । सदा राहावे प्रसन्न | आम्हावरी अनुसंधान । राहावे देवी सदा तुझे ।। २९ ।। दुर्गे तू प्रसन्न होत । विश्वाचा अभ्युदय होत । सर्वत्र शांती नांदत । तुझिया कृपे करोनिया ।। ३० ।। ज्यावरी तू प्रसन्न होसी । धन, यश, कीर्ती लाभे त्यासी । मरणांती स्वर्ग लोकासी । सुखे निवास करीतसे ।। ३१ ।। आयुरारोग्य यश संपत्ती । स्त्री पुत्रादी वैभव प्राप्ती । लोक धन्य धन्य म्हणती । तुझ्या कृपे करोनिया ।। ३२ ।। तुझ्या कृपेने धर्माचरण । तुझ्या कृपेने तीर्थाटन । तुझ्या कृपेने पुरश्चरण । होती हातून मानवाच्या ।। ३३ ।। तीनही लोकी तू श्रेष्ठ । देसी भक्तां मनोवांच्छित । तू सदा दयार्द्र चित्त । कृपा करिसी भक्तांसी ।। ३४ ।। तू होता क्रोधित । नाश करिसी क्षणभरात । असुरकुळ संहारीत । पाहिले आम्ही डोळ्याने ॥ ३५ ॥ जगासी व्हावे सुख प्राप्त । म्हणोनी दुष्टांसी तू वधित । अन्यथा तुझे शत्रुत्व । नाही पाहा कोणाशी ।। ३६ ।। कृपा आणि निष्ठुरता । कैसी पाहा हे साम्यता । श्रेष्ठ तिन्ही लोकांत । म्हणौनी अससी देवी तू ।। ३७ ।। त्रिशूले रक्ष देवी तू । अंबे खड्गाने रक्ष तू । घंटा, धनुष्याने तू । सदैव रक्षी आम्हासी ।। ३८ ।। पूर्व पश्चिम दक्षिणोत्तर । फिरवी त्रिशूल सुंदर । रक्षी रक्षी सत्वर । श्रीदुर्गे परमेश्वरी ।। ३९ ।। तिन्ही लोकांमध्ये काही । सुंदर भयंकर देही । विचरत सर्व स्थळी ही । त्यापासूनी तू रक्षावे ।। ४० ।। ऊर्ध्व अधर दिशा दाही । रक्ष रक्ष दुर्गे पाही । खड्ग, शूल, गदा सर्वही । शस्त्रे घेवोनी रक्षावे ॥। ४१॥ ऐसे परी देवतागण । करिती दुर्गेचे स्तवन । दिव्य पुष्पे गंध चंदन । पूजा करिती देवीची ॥। ४२ ।। दिव्य सुगंध धूप दीप । देवता अर्पिती देवीप्रत । प्रसन्नवदन देवी म्हणत । प्रणाम करोनी देवांसी ॥ ४३ ॥ दुर्गा म्हणे जे वांच्छित । ते तुम्ही मागा त्वरित । देवता म्हणती दुर्गेप्रत । सदैव रक्षी म्हणोनिया ॥ ४४।। तू मारिला महिषासुर । झाले बहु उपकार । भविष्यात संकट दूर । करी देवी महेश्वरी ।। ४५ ।। या अध्यायाचे करी जो पठण । त्याते करी धनवान । इतुके देई वरदान । देवता म्हणती देवीसी ।। ४६ ।। ऋषी म्हणती नृपासी । जगत् कल्याण कारणासी । देव देवता परियेसी । वर मागते जाहले ।। ४७ ।। तथास्तु दुर्गा म्हणत । आणि अंतर्धान होत । ऐसे पाहा अद्भुत । चरित्र आहे दुर्गेचे ।। ४८ ।। तद्नंतर दुर्गा प्रकट । केव्हा आणि कशी होत । तेही चरित्र अद्भुत । सांगेन जाण तुजलागी ।। ४९ ।। इति मार्कण्डेय पुराण । सावर्णिक मन्वंतर जाण । देवी माहात्म्य वर्णन । चौथा अध्याय गोड हा ।। ५० ।।
।। स्वस्ति दुर्गा सप्तशती अध्याय चौथा ।। (ओवी संख्या ५०)
।। अध्याय पाचवा ॥
श्री गणेशाय नमः । ॐ दुम् दुर्गायै नमः । ॐ ऐम् सरस्वत्यै नमः । या उत्तरचरित्रासी । महासरस्वती देवता परियेसी । अनुष्टुप् छंद रुद्र ऋषी । भीमाशक्ती म्हणावे ।। १ ।। भ्रामरी बीज सूर्यतत्त्व । सामवेद परिपूर्ण । महासरस्वती प्रीत्यर्थ । जपे विनियोगा म्हणावे ॥ २ ॥ घंटा, शूल, हल, धारण । शंख, मुसळ, चक्र, बाण । धनुष्य करी घेवोन । दैत्य नाशा प्रकटली ।। ३ ।। शारदीय चंद्रकले समान । मुखचंद्र दिसे प्रसन्न । गौरीपासून निर्माण । झाली महासरस्वती ।। ४।। शुंभ-निशुंभाचा नाश । करावया प्रकटली ईश । ऋषी म्हणे नृपा ऐक । चरित्र महादुर्गेचे ॥ ५ ॥ शुंभ-निशुंभ नामे असुर । प्रकट झाले भूवर । करून पराक्रम थोर । तिन्ही लोक जिंकिले ॥ ६ ॥ स्वर्ग, मृत्यू, पाताळ । सर्वत्र दैत्यांचा खेळ | देव होऊनी निर्बल । सोडून पळाले स्वर्गासी ।। ७ ।। सूर्य, अग्नि, वरुण, कुबेर । वायू, यम, चंद्र, इंद्र । घेतले हिरोन अधिकार । दैत्य राजे तेधवा ।। ८॥ सर्वांसी करोनी तिरस्कृत । स्वर्गातूनी हाकलीत । सर्वदेव स्मरण करीत । अपराजिता देवीते ।। ९ ।। म्हणती जगदंबेने । वर दिधला आम्हाते । आपत्काली स्मरा माते । तात्काळ येईन धावोनिया ॥१०॥ ऐसा विचार करोन । देव निघाले स्वर्गाहून । हिमालय पर्वती येवोन । स्तवन करती देवीचे ।। ११ ।।
देवी सूक्त प्रारंभ
महादेवी नमोस्तुते । शिवे कल्याणकारिणी । आदिमाया प्रकृती । वंदन तुते करितो ।। १२ ।। अनादी सिद्ध तू नित्य । सर्व जगा प्रतिपाळीत । वंदन तुते करीत । सुखदायिनी तुज नमो ॥। १३ ।। रौद्रा नमो नित्या नमो । दुर्गे कल्याणकारिणी । ज्योत्स्ना नमो नित्या नमो । अंबा अर्धमातृका ।। १४।। ऋद्धी नमो सिद्धी नमो । नमो नैऋति भूभृता । शिवा लक्ष्मी ख्याता । दुर्गे देवी नमो तुज ।। १५।। अति सौम्या नमो अति रुद्रा नमो । जगत्पालिनी नमोस्तुते । जगदाधार दुर्गे तू । स्वीकारी नमन आमुचे ।। १६ ।। दुर्गे सर्व प्राणिमात्रांत । विष्णुमाया तूचि होत । नमोस्तुते नमोस्तुते । तुज नमस्कार आमुचा ।। १७ ।। दुर्गे सर्व भूतांत । चेतना रूपे तू राहत । नमोस्तुते नमोस्तुते । तुज नमस्कार आमुचा ।। १८ ।। दुर्गे सर्व मानवांत । बुद्धी रूपे तू राहत । नमोस्तुते नमोस्तुते । तुज नमस्कार आमुचा ।। १९।। दुर्गे सर्व प्राणिमात्रांत । निद्रा रूपे तू राहत । नमोस्तुते नमोस्तुते । तुज नमस्कार आमुचा ।। २० ।। दुर्गे सर्व प्राणिमात्रांत । क्षुधा रूपे तू राहत । नमोस्तुते नमोस्तुते । तुज नमस्कार आमुचा ।। २१ ।। दुर्गे सर्व प्राणिमात्रांत । छाया रूपे तू राहत । नमोस्तुते नमोस्तुते । तुज नमस्कार आमुचा ।। २२ ।। दुर्गे सर्व प्राणिमात्रांत । शक्ती रूपे तू राहत । नमोस्तुते नमोस्तुते । तुज नमस्कार आमुचा ।। २३ ।। दुर्गे सर्व प्राणिमात्रांत । तृष्णा रूपे तू राहत । नमोस्तुते नमोस्तुते । तुज नमस्कार आमुचा ।। २४ ।। दुर्गे उत्तम मानवांत । क्षमा रूपे तू राहत । नमोस्तुते नमोस्तुते । तुज नमस्कार आमुचा ।। २५ ।। दुर्गे सर्व प्राणिमात्रांत । विविधत्व रूपे तू राहत । नमोस्तुते नमोस्तुते । तुज नमस्कार आमुचा ।। २६ ।। दुर्गे सर्व मानवांत । लज्जा रूपे तू राहत । नमोस्तुते नमस्कार आमुचा ।। २७ ।। दुर्गे उत्तम मानवांत । शांती रूपे तू राहत । नमोस्तुते नमस्कार आमुचा ।। २८ ।। दुर्गे सर्व मानवांत । श्रद्धा रूपे तू राहत । नमोस्तुते नमोस्तुते । तुज नमस्कार आमुचा ।। २९ ।। दुर्गे सर्व प्राणिमात्रांत । भ्रम रूपे तू राहत । नमोस्तुते नमोस्तुते । तुज नमस्कार आमुचा ।।३०।। दुर्गे सुंदर मानवांत । सौंदर्य रूपे तू राहत । नमोस्तुते नमोस्तुते । तुज नमस्कार आमुचा ।। ३१ ।। दुर्गे काही मानवांत । लक्ष्मी रूपे तू राहत । नमोस्तुते नमोस्तुते । तुज नमोस्तुते । तुज नमोस्तुते । तुज नमस्कार आमुचा ।। ३२ ।। दुर्गे सर्व मानवांत । प्रवृत्ती रूपे तू राहत । नमोस्तुते नमोस्तुते । तुज नमस्कार आमुचा ।। ३३ ।। दुर्गे सर्व मानवांत । स्मृती रूपे तू राहत । नमोस्तुते नमोस्तुते । तुज नमस्कार आमुचा ।। ३४ ।। दुर्गे सर्व मानवांत । दया रूपे तू राहत । नमोस्तुते नमोस्तुते । तुज नमस्कार आमुचा ।।३५ ।। दुर्गे सर्व प्राणिमात्रांत । तृप्ती रूपे तू राहत । नमोस्तुते नमोस्तुते । तुज नमस्कार आमुचा ।। ३६ ।। दुर्गे सर्व मानवांत । भक्ती रूपे तू राहत । नमोस्तुते नमोस्तुते । तुज नमस्कार आमुचा ।। ३७ ।। दुर्गे काही मानवांत । ज्ञान रूपे तू राहत । नमोस्तुते नमोस्तुते । तुज नमस्कार आमुचा ।। ३८ ।। दुर्गे काही मानवांत । विवेक रूपे तू राहत । नमोस्तुते नमोस्तुते । तुज नमस्कार आमुचा ।। ३९ ।। दुर्गे काही मानवांत । दातृत्व रूपे तू राहत । नमोस्तुते नमोस्तुते । तुज नमस्कार आमुचा ।। ४० ।। दुर्गे सर्व प्राणिमात्रांत । प्रेम रूपे तू राहत । नमोस्तुते नमोस्तुते । तुज नमस्कार आमुचा ।। ४१ ।। दुर्गे श्रेष्ठ मानवांत । मानवता रूपे तू राहत । नमोस्तुते नमोस्तुते । तुज नमस्कार आमुचा ।। ४२ ।। दुर्गे काही मानवांत । सहनशक्ती रूपे तू राहत । नमोस्तुते नमोस्तुते । तुज नमस्कार आमुचा ।। ४३ ।। दुर्गे सर्व योग्यांत । तप रूपे तू राहत । नमोस्तुते नमोस्तुते । तुज नमस्कार आमुचा ।। ४४ ।। दुर्गे सर्व योग्यांत । नाद रूपे तू राहत । नमोस्तुते नमोस्तुते । तुज नमस्कार आमुचा ।। ४५ ।। दुर्गे सर्व योग्यांत । बिंदू रूपे तू राहत । नमोस्तुते नमोस्तुते । तुज नमस्कार आमुचा ।। ४६ ।। दुर्गे सर्व योग्यांत । कला रूपे तू राहत । नमोस्तुते नमोस्तुते । तुज नमस्कार आमुचा ॥ ४७ ॥ दुर्गे सर्व योग्यांत । प्रज्ञा रूपे तू राहत । नमोस्तुते नमोस्तुते । तुज नमस्कार आमुचा ॥। ४८ ।। दुर्गे सर्व योग्यांत । ऋतंभरा रूपे तू राहत । नमोस्तुते नमोस्तुते । तुज नमस्कार आमुचा ।। ४९ ।। दुर्गे सर्व योग्यांत । धारणा रूपे तू राहत । नमोस्तुते नमोस्तुते । तुज नमस्कार आमुचा ॥ ५० ॥ दुर्गे सर्व योग्यांत । ध्यान रूपे तू राहत । नमोस्तुते नमोस्तुते । तुज नमस्कार आमुचा ॥ ५१ ॥ दुर्गे सर्व योग्यांत । समाधी रूपे तू राहत । नमोस्तुते नमोस्तुते । तुज नमस्कार आमुचा ।। ५२ ।। दुर्गे सर्व विश्वात । शून्य जे ते तूचि असत । नमोस्तुते नमोस्तुते । तुज नमस्कार आमुचा ।। ५३ ।। दुर्गे अक्षर प्रांतात । महाशून्य तूचि असत । नमोस्तुते नमोस्तुते । तुज नमस्कार आमुचा ॥ ५४ ॥ दुर्गे सर्व ब्रह्मांडात । ब्रह्म रूपे तू राहत । नमोस्तुते नमोस्तुते । तुज नमस्कार आमुचा ।। ५५ ।। दुर्गे आदि अंतातीत । परमशून्य तूचि असत । नमोस्तुते नमोस्तुते । तुज नमस्कार आमुचा ।। ५६ ।। दुर्गे सर्व प्राणिमात्रांत । जगन्माता तू असत । नमोस्तुते नमोस्तुते । तुज नमस्कार आमुचा ।। ५७ ।। सर्व इंद्रियांची अधिष्ठात्री । प्राणिमात्रांमध्ये व्याप्ती । राहोनी सर्वांपरती । ऐशा दुर्गे नमो तुज ।। ५८ ।। या विश्वामाजी चैतन्य | भरले असे जे गुप्त । तेची दुर्गे तू असत । तुज नमस्कार आमुचा ।।५९।। इंद्रादी देवतांनी । स्तविले दुर्गे पूर्वी तुजसी । वारी आमुच्या विपत्तीसी । म्हणोनी आम्ही प्रार्थितो ।। ६० ।। विनम्रतेने करता स्मरण । जगदंबा येई धावोन । त्या परमेश्वरीते वंदन । करितो भक्तिभावाने ।। ६१।। देव संकटाते वारी । आपत्तीते दूर करी । ऐसी दुर्गा परमेश्वरी । तुज नमस्कार आमुचा ।। ६२ ।।
॥ स्वस्ति देवी सूक्त ॥
ऐसे परी सर्व देवता । दुर्गास्तुती करिती देखा । ऋषी म्हणती अद्भुत । वर्तले पाहा तेथवरी ।। ६३।। गंगास्नानाचे करूनी निमित्त । पार्वती येई तेथ । देवतांते पुसत । काय कारण यावया ॥ ६४॥ कळे सर्व समाचार । शुंभ निशुंभ असुर । पीडिले म्हणून येथवर । आले देव मिळोनिया ।। ६५ ।। पार्वती देहामधून । अंबिका तेथे प्रकटोन । दिले देवांसी आश्वासन । शुंभ निशुंभ वधाचे ।। ६६ ।। प्रकटे पार्वतीचे कोशातून । कौशिकी नामे म्हणून । देवे जयजयकारे करोन । श्री अंबिकेते वंदिले ।। ६७।। कौशिकी प्रकटता देहातून । पार्वती होई कृष्णवर्ण । हिमालयस्थित कालिका म्हणोन । प्रख्यात झाली अवधारा ।। ६८ ।। असो पार्वती आणि देव सर्व । गेले थोडे दूरवर । एकली अंबा तेथवर । राही पाहा तेधवा ।। ६९ ।। शुंभ-निशुंभाचे भृत्य । चण्ड-मुण्ड नामे ख्यात । महापराक्रमी असत। तेथे पाहा पातले ।। ७० ।। पाहोनी स्त्री सुंदर । शुंभासी देती समाचार । स्त्री परम मनोहर । आहे एक हिमालयी ।। ७१ ।। इतुकी परम सुंदर । त्रैलोक्यात नाही असुर । अंगकांती मनोहर । उपमा नाही वर्णाया ।। ७२ ।। तिच्या तेजाने प्रकाशित । हिमालय आहे होत । ऐसे रत्न अद्भुत । आपणापाशी हवे हो ।। ७३ ।। हे प्रभो दैत्यराज । इंद्राचा ऐरावत गज । हंस विमान विहार काज । आपणापाशी आहे हो ।। ७४ ।। त्रिलोकांतील दिव्य रत्न । पारिजात उच्चैश्रवा अश्व । कुबेराचे धन सर्व आपणापाशी आहे हो ।। ७५ ।। किंजक्लिनीमाला अद्भुत । जी कधीही न कोमेजत । समुद्र भेट देत । आपणापाशी आहे हो ।। ७६ ।। सुवर्णाची वर्षा करीत । ऐसे वरुणाचे छत्र । प्रजापतीचा दिव्य रथ । आपणापाशी आहे हो ।। ७७ ।। अग्निसिद्ध दिव्य वस्त्र । समुद्रातील सर्व रत्न । वरुणाचा दिव्य पाश । निशुंभापाशी आहे हो ।। ७८ ।। हे सर्व फिके पडत । ऐसे स्त्री रत्न अद्भुत । एकली हिमालयी फिरत । का न तिते आणता ।। ७९ ।। ऐकोनी चण्ड-मुण्ड वचन । सुग्रीव दूता बोलावून । म्हणे स्त्रियेते घेऊन । येथे यावे सत्वरी ॥ ८० ॥ जेथे दुर्गा अंबिका । जावोनिया तेथे देखा । मधुर वचने सांगता । झाला पाहा देवीसी ।। ८१ ।। म्हणे दूत देवीसी । दैत्यराज शुंभ या समयासी । अधिपती त्रैलोक्यासी । दूत त्याचा मी असे ।। ८२ ।। तोची परमेश्वर सांप्रत । देवता आज्ञा पाळीत । तुज कारणे संदेश देत । एकाग्र चित्ते ऐकावा ।। ८३ ।। त्रैलोक्य माझ्या आधीन । देवता माझ्या आधीन । यज्ञ भोगी स्वाधीन । ऐसा समर्थ मी असे ॥ ८४ ॥ त्रिलोकीचे दिव्य रत्न । आहेत मज स्वाधीन । ऐरावत इंद्राचे वाहन । आहे आज मज जवळी ॥। ८५ ।। समुद्रमंथनी निघत । उच्चैश्रवा ज्याते म्हणत। तोही मज लागी अर्पित । केला पाहा देवांनी ॥। ८६ ।। देवता गंधर्वांचे जितुके रत्न । यक्ष नागांचेही रत्न । सारे मजपाशी पडोन । आहेत जाणा संग्रही ।। ८७ ।। तुही एक स्त्रीरत्न । यावे त्वा मजप्रत। रत्नांते आदर करीत । हाची स्वभाव आमुचा ।। ८८ ।। यावे माझ्या सेवेत । अथवा भ्राता शुभ सेवेत । राहोनिया सुखात | आयुष्य आपुले वेची का ।। ८९ ।। माझी पत्नी होसी । विपुल ऐश्वर्य भोगीसी । राहोनिया अरण्यासी । काय तुज मिळते गे ||१०|| ऐकोनी दूताचे वचन । दुर्गा देवी स्मितवदन । बोलली जे गंभीर वचन । ऋषी म्हणती अवधारा ।। ९९ ।। देवी म्हणे दूतासी । तू जे जे बोललासी । आहे सत्य परियेसी । प्रतिज्ञाबद्ध मी असे ||१२|| मी केला असे एक पण । जो मम अभिमान करी चूर्ण । मज सम जो बलवान । त्याची पत्नी होईन मी ।। ९३ ।। म्हणोनी शुंभ अथवा निशुंभ । यावे करावा संग्राम | शीघ्र मज जिंकोन । पाणिग्रहण माझे करावे ।। ९४ ।। दूत म्हणे घमेंड करिसी । कोण आहे त्रैलोक्यासी । लढे शुंभ-निशुंभासी । ऐसा कोणी असेचिना ।। ९५ ।। साऱ्या देवदेवता एकवटोन । रणी न राहिले एक क्षण । एकली तू स्त्री जाण । उगाच हट्ट करू नको ।। ९६ ।। तू ऐक माझे वचन । सन्माने नेतो तुज लागोन । नातरी केस पकडोन । ओढोनी न्यावे लागतसे ।। ९७ ।। तव जाईल सर्व सन्मान । तू होशील दीन वदन । म्हणोनी चल येथोन । दैत्य मानील तुजलागी ।। ९८ ।। देवी म्हणे दूतासी । तू सत्य ते सांगसी । शुंभ-निशुंभ असम साहसी । महारथी ते देखा ।। ९९ ।। महापराक्रमी ते असती । त्या पाहोनी देव पळती । परी मी महा मंदमती । प्रतिज्ञा करोनी बैसले ॥ १०० ॥ अज्ञान अहंकारे वश । अति आत्मविश्वास । याने घेतला घास । माझा मीच जाण पां ।। १०१ ।। परी आता करावे काय । यांसी नोहेची उपाय । दैत्यापाशी तू जाय । सांगे त्याते सर्वही ॥१०२॥ तद्नंतर जे उचित । योग्य जे ते आचरित । ऋषी नृपाते सांगत । पुढील अध्यायी ती कथा || १०३ ।। ऐशापरी हे कथानक । येथे संपले देख । पाचवा अध्याय संपत । आला पाहा येथवरी ॥ १०४ ॥ मार्कण्डेय पुराण । त्यातील हे देवी आख्यान । सावर्णिक मन्वंतरात जाण । कथा घडल्या या साया ।। १०५ ।। दुर्गा सप्तशती दिव्य ग्रंथ । पठणे पुरती मनोरथ । देवी माहात्म्य येथ । पाच अध्याय जाहले ।। १०६ ।। देवी दूत संवाद । देवी सूक्त या अध्यायात । त्याचे पाठ जो करीत । सर्व साधे तयासी ।। १०७ ।। संपूर्ण ग्रंथपठण । हे न जमे ज्या लागोन । त्याने देवी सूक्ताचे पठण । नित्य करावे जाण पा । । १०८।। तेणे देवीकृपा होवोन । होतील मनोरथ पूर्ण । आयुरारोग्य ज्ञानवर्धन । होईल जाणा निश्चये ।। १०९ ।। दुर्गा सप्तशती ग्रंथ । पाचवा अध्याय वर्णिला येथ । देवी सूक्त देवी माहात्म्य । या अध्यायात वर्णिले ।।११०।।
।। स्वस्ति दुर्गा सप्तशती अध्याय पाचवा ।। (ओवी संख्या ११० )
॥ अध्याय सहावा ॥
ॐ श्रीम् ऱ्हीम् क्लीम् ॐ । ॐ गं गणपतये नमः । ॐ ऐम् हीम् क्लीम् चामुण्डायै विच्चै । भैरव सर्वज्ञेश्वर । त्याची अर्धांगी सुंदर । पद्मावती तेजोभास्कर । तिचे चिंतन करीतसे ॥ १ ॥ नागासनी विराजमान । नागमणी मणिभूषण । त्रिनेत्र सुहास्य वदन । ऐसे ध्यान तियेचे ॥२॥ भाळी चंद्रकोर शोभत । कुंभ, कपाल करांत । जपमाळ सव्य हातात । त्या देवी ते नमितसे ।। ३ ।। ऐसे देवीचे करोनी ध्यान । ऋषी म्हणती नृपा लागोन । देवीचे ऐकोनी वचन । दूत जाई माघारा ॥ ४ ॥ जावोनिया शुंभापाशी । दूत म्हणे नृपा परियेसी । ती स्त्री उन्मत्त परियेसी । युद्ध करावे म्हणतसे ।। ५ ।। ऐकोनी दूताचे वचन । दैत्य होई कोपायमान । सेनापती धूम्रलोचन । त्यासी आज्ञा देतसे ।। ६ ।। तुवा त्वरित जावोनी । आणी तिसी पकडोनी । तिचे केस धरोनी । ओढीत येथे आणी पा ।। ७ ।। तिचे कोणी रक्षक । असती देव गंधर्व यक्ष । मारोनी टाका त्वरित । उपेक्षा जरा करू नका ॥ ८ ॥ शुंभ आज्ञा घेवोन । सेनापती धूम्रलोचन । साठ सहस्त्र सेना घेवोन । तेथोनिया निघाला । ९ ।। येवोनिया देवीपाशी । दैत्य म्हणे परियेसी । चल निघ शुंभ निशुंभापाशी । अथवा ओढोनी नेईन मी ।। १० ।। देवी म्हणे दैत्यासी । तू पराक्रमी अससी । विशाल सेना तुजपाशी । नेई ओढोनी मजला तू ।। ११ ।। जरी असेल सामर्थ्य । नेई मजला ओढीत । धूम्रलोचन धावत । श्री दुर्गेसी धरावया ।। १२ ।। ‘हुम्’ देवी शब्द म्हणत । धूम्रलोचन भस्म होत । सिंह आकांत करीत । दैत्य सैन्यामाझारी ।। १३ ।। शस्त्रवर्षाव करीत । देवीने मारिले दैत्य । साठ सहस्त्र सेनेप्रत । यमसदना धाडिले देवीने ।। १४ ।। शुंभासी कळे समाचार । देवीने मारिले असुर । क्रोधे कापे थरथर । शुभ दैत्य तेधवा ।। १५ ।। महादैत्य चण्ड-मुण्ड । त्यांसी पाचारी त्वरित । म्हणे महा सेनेसहित । तुम्ही जावे तेथवरी ।। १६ ।। आसुरी माया, शस्त्र, अस्त्र । सोडा त्या स्त्रीवरी त्वरित । मारा तिसी सिंहासहित । मगची यावे माघारा ।। १७ ।। जरी ती शरण येत । बांधोनी आणा येथे । मी प्रतिक्षा करीत । आहे येथे बैसलेला ।। १८ ।। दैत्य आज्ञा घेवोन । एक लक्ष सेना जमवून । चण्ड-मुण्ड तेथून । निघाले पाहा युद्धासी ।। १९ ।। दुर्गा सप्तशती ग्रंथ । षष्ठ अध्याय वर्णिला येथ । ऋषी नृपास सांगत । सावर्णिक मन्वंतरामाझारी ॥ २० ॥
।। स्वस्ति दुर्गा सप्तशती अध्याय सहावा ।। (ओवी संख्या २०)
।। अध्याय सातवा ॥
ॐ श्रीम् नमः। ॐ क्लीम् नमः । ॐ हीम् नमः | श्री गणेशाय नमः । रत्नजडित सिंहासन । वर्ण जिचा असे श्याम । शुक शब्द करी श्रवण । ऐसे ध्यान देवीचे ।। १ ।। मस्तकी अर्धचंद्र विराजित । कमलावर चरण ठेवीत । कल्हारमाळा गळ्यात । वीणा मधुर वाजवीत ॥ २ ॥ भाळी बिंदी वर्तुळाकार । रक्तवस्त्र अंगावर । ऐसे ध्यान सुंदर । मातंगी नाम देवीचे ।। ३ ।। चतुरंगिणी सेनेसहित । चण्ड-मुण्ड हिमालयी जात । सिंहवाहिनी दुर्गा देखत । पर्वत शिखरी बैसली ।। ४ ।। आयुधे सरसावोनी । सर्व जाती धावोनी । दुर्गा क्रोधे करूनी । भृकुटी तेढी करीतसे ॥ ५ ॥ क्रोधे मुख काळे पडत । काली विकराल प्रकटे तेथ । नरमुण्डमाळा शोभत । चर्म पांघरले चित्त्याचे ।। ६ ।। विशाल उग्र मुख । जिव्हा बाहेर लवलवत । भयंकर गर्जना करीत । दैत्यसंहार मांडिला ।। ७ ।। विशाल भयंकर रूप धरिले । भूमी गगनासी व्यापिले । सहस्त्रावधी दैत्यांसी पकडले । एका मुठीत कालीने ॥८॥ चिमटीत अश्व, रथ, गज, सारथी । पकडोनी आपटी भूमीसी । संहार करी ऐसी । महाकाली जगदंबा ॥ ९ ॥ काही क्षणा भीतर । मारिले लक्षावधी असुर । हे पाहोनी चण्ड-मुण्ड भयंकर । धावोनी जाती कालीवरी ।। १० ।। सहस्त्रावधी शर । सोडती ते कालीवर । ते सर्व मुखांतर । शोषून काली घेतसे ।। ११ ।। एक भयंकर तलवार । हाती घेऊन उग्र । रूप दावी भयंकर । जैसा प्रलय मांडिला ।। १२ ।। हाती घेऊन खड्ग । ‘हम्’ शब्दोच्चार करीत । चण्ड दैत्याचे कापीत । शिर तेव्हा अवधारा ।। १३ ।। चण्ड दैत्याते मारून । देवी करी गर्जन । मुण्ड येई धावोन । देवीलागी माराया ।। १४ ।। त्यासही धराशयी । तात्काळ देवी करी पाही । चण्ड-मुण्ड लवलाही । मारिले पाहा देवीने ।। १५ ।। पाहोनी चण्ड-मुण्ड मृत । दैत्य सेना पळो लागत । चण्ड-मुण्डाचे मस्तक । उचलले पाहा देवीने ।। १६ ।। चण्ड-मुण्ड शिरे घेऊन । पातली काली चण्डिका स्थान । दोन्ही शिरे दाखवोन । देवी लागी म्हणतसे ।। १७ ।। महाकाली म्हणे चण्डिके प्रत । ही शिरे महादैत्य । आणिली भेट तुजप्रत । स्वीकारी याते तू देवी ।। १८ ।। आता शुंभ-निशुंभाते । तू मारी स्वहस्ते । ते कार्य तव हस्ते । होणार आहे अवधारा ।। १९ ।। चण्ड-मुण्ड शिरे पाहोन । अंबिका चण्डी बोले वचन । चामुण्डा नामाभिधान । तुते म्हणती जाण पा ।। २० ।। चण्ड-मुण्डाते मारिले । चामुण्डा नाम दिले । प्रख्यात देवीचे झाले । नाम पाहा हो भूवरी ।। २१ ।। ऐसी काली चामुण्डा । प्रख्यात झाली देखा । ऋषी म्हणती नृपा ऐक । चरित्र ऐसे देवीचे ।। २२ ।। श्री मार्कण्डेय पुराण । देवी माहात्म्य वर्णन | चण्ड-मुण्ड आख्यान । सातवा अध्याय गोड हा ॥ २३ ॥
।। स्वस्ति दुर्गा सप्तशती अध्याय सातवा ।। (ओवी संख्या २३)
।। अध्याय आठवा ॥
ॐ श्रीम् नमः । ॐ ऐम् व्हीम् श्रीम् । ॐ महालक्ष्म्यै नमः | अणिमादि अष्टसिद्धी । जिसी ध्याता प्राप्त होती । पाशांकुश शोभे हाती । त्या भवानीते नमितसे ।। १ ।। जी आरक्तवर्ण शोभत । नेत्री करुणा लहरत । ऐसी भवानी दुर्गा ध्यात । राहावे सदा सर्वदा ।। २ ।। ऋषी म्हणती नृपासी । चण्ड-मुण्ड राक्षसांसी । मारिता कोप शुंभासी । कापे थरथरा तो देखा || ३ || संपूर्ण दैत्य सेनेप्रत । शुंभ तेव्हा आज्ञापीत । म्हणे प्रस्थान त्वरित । करा तुम्ही युद्धासी ॥ ४ ।। श्याऐंशी उदायुध सेनापती । चौऱ्याऐंशी कम्बू सेनापती । पन्नास कुलवीर्यपती । शत धौम्रकुळाचे ते ।। ५ ।। आणखी या व्यतिरिक्त । दौर्हद मौर्य कालकेय । प्रस्थापन करिती देख । युद्धालागी तेधवा ।। ६ ।। त्या सेनेते देखोन । चण्डिका प्रत्यंचा ओढोन । टणत्कार करी भीषण । भेदे गगना तो देखा ।। ७ ।। सिंह देवी वाहन । गर्जना करी भीषण । कालीही मुख पसरोन । खाऊ पाहे दैत्यांसी ॥ ८ ॥ ते समयी आणखी एक । वर्ते तेथे अद्भुत । देव देहामधूनी निघत । शक्ती त्यांच्या बाहेरी ॥ ९ ॥ विष्णू शिव कार्तिकेय । ब्रह्मा इंद्र नारसिंह । सर्व देवांमधून । शक्ती आल्या बाहेरी ।। १० ।। ज्या देवाचे जैसे रूप । त्याही तैशाची दिसत । परी स्त्री रूपे असत । जाणा त्यांची सर्वही ।। ११ ।। हंसयुक्त विमानात । माला कमंडलू शोभत । ब्रह्माशक्ती उपस्थित । ब्रह्माणी म्हणती तियेला ।। १२ ।। हाती त्रिशूल वृषभारूढ । महानाग कर कंकण । माहेश्वरी तिते म्हणत । महादेवाची शक्ती ।। १३ ।। कौमारी शक्ती अद्भुत । मयूर वाहन तिचे शोभत । कार्तिकेय शक्ती असत । युद्धालागी पातली ।। १४ ।। विष्णू शक्ती वैष्णवी । गरुडावरी बैसोनी । शंख, चक्र, गदा, पाणि । आली युद्ध करावया ।। १५ ।। वाराही शक्ती वराहाची । नारसिंही शक्ती नृसिंहाची । झाली तेथे उपस्थिती । दैत्य निर्दालन करावया ।। १६ ।। हाती घेवोनी वज्र । इंद्राणी इंद्र शक्ती येत । ऐरावतावरी बैसत । युद्धालागी येतसे ।। १७ ।। महादेव म्हणे देवीप्रत । असुर संहार करी त्वरित । माजले असती बहुत । यांसी शीघ्र मारी तू ।। १८ ।। तव दुर्गा देहामधून । परम उग्र शक्ती प्रकटोन । अट्टाहास करोन । दावी तेव्हा दैत्यासी ।। १९ ।। ती शक्ती प्रचंड | म्हणोनी चण्डिका नाम । ती महादेवासी वचन । बोलती झाली तेधवा ।। २० ।। चण्डिका म्हणे महादेवासी । आपण जावे दैत्यापासी । सांगावे तेथे सर्वांसी । निरोप माझा अवधारा ।। २१ ।। हे दैत्यांनो तुम्ही क्रूर । देवा मानवा छळले फार । पाताळ लोका सत्वर । पळोनी जावे तुम्ही हो ।। २२ ।। जरी वाटे युद्ध करावे । तरी मी येथे आहे । क्षणांत मारुनी खाती । ऐशा माझ्या शक्ती या ।। २३ ।। शिवासी केले दूत । शिवदूती नामे प्रख्यात । तेव्हापासूनी होत । देवी पाहा इतिहासी ।। २४ ।। शिववचन ऐकोनी । दैत्य क्रोधे भरले मनी । देवीवरी चालोनी । सैन्यासहित जाती ते ।। २५ ।। दैत्य सैन्य देवीवरी जात । विविध अस्त्रे सोडत । देवी एका क्षणार्धात । मोडून टाकी अस्त्राते ।। २६ ।। काली मुख पसरोन । त्रिशूल हाती घेऊन । दैत्याते मारी दारुण । अपार वेग तिचा असे ।। २७ ।। ब्रह्माणी कमंडलू जल | सिंचन करी युद्धस्थळ । दैत्यांते करी हतबल । शौर्य सारे जातसे ।। २८ ।। माहेश्वरी मारी त्रिशुलाने । वैष्णवी मारी चक्राने । कौमारी संहारी शक्तीने । ऐसा संहार मांडिला ।। २९ ।। इंद्राणी वज्रप्रहाराने । वाराही दिव्यशक्तीने । नारसिंही मारी नखाने । ऐसा संहार मांडिला ।। ३० ।। मध्येची देवी वाहन । सिंह करी दैत्यकंदन । चण्डिका प्रचंड गर्जोन । संहारी पाहा दैत्यासी ।। ३१।। ऐसा प्रचंड संहार । झाला पाहा तेथवर । पळावयासी मग असुर । संधी शोधू लागले ।। ३२ ।। परी देवी शक्ती पाहत । तात्काळ त्यांते पकडत । यम सदनासी धाडीत । पळो नेदी कोणाते ।। ३३ ।। ऐसे चालले कंदन । भयभीत असुर दारुण । पळावयासीही स्थान । कोठे पाहता दिसेना ।। ३४ ।। ऐसे युद्ध भयंकर । चालले असे तेथवर । रक्तबीज महाअसुर । चालोनी पाहा येतसे ।। ३५ ।। त्याच्या रक्ताचा थेंब | पडता भूमीवरी देख । दुसरा दैत्य प्रकटत । ऐसे सामर्थ्य तयाचे ।। ३६ ।। प्रत्येक थेंबागणिक । दैत्य तेथे निर्माण होत । पराक्रमी बलशाली असत । रक्तबीजा सम तेही ।। ३७।। ऐसा तो महाअसुर । देवी सैन्यात हाहा:कार । उडवोनी देतसे थोर । काय करावे कळेना ।। ३८ ।। इंद्राणीने वज्रप्रहार । वैष्णवीने चक्रप्रहार । करिता वाहे रुधिर । देहातूनी त्या दैत्याच्या ।। ३९ ।। परी थेंबागणिक । निर्माण होती दैत्य । सहस्त्रावधी निर्माण होत । ऐसे दैत्य तेथवरी ।। ४०।। कौमारी शक्तीने प्रहार । वाराही खड्गाने मार । माहेश्वरी त्रिशूल वार । करिती रक्तबीजावरी ।। ४१।। तोही मातृकावरी प्रहार । करी देखा दुर्धर । देवता संकटी थोर । पडल्या पाहा तेधवा ।। ४२ ।। पाहोनी देवता उदास । चण्डिका म्हणे कालीस । पसरोनिया मुखास । रक्ताते तू प्राशावे ।। ४३ ।। ऐसे जव तू करीत । दैत्य मरेल निश्चित । ऐकोनी देवीची मात । काली प्राणी रक्ता ॥ ४४ ॥ काली प्राशी दैत्य रक्त । तेणे तो क्षीण होत । शस्त्रप्रहार त्यावरी करीत । सर्व देवता मिळोनिया ।। ४५ ।। रक्तबीज असा मारिला । देवा बहु आनंद झाला । पुष्पवर्षाव त्या वेळा । करिती पाहा देवीवरी ।। ४६ ।। रक्तपानाने उन्मत्त । मातृगण रणी नृत्य करीत । हर्ष साजरा करीत । महाविजय हा म्हणोनिया ।। ४७।। रक्तबीजाते मारिले । देवाते आनंदविले । नवल ऐसे केले । पाहा दुर्गा देवीने ।। ४८ ।। देवी सप्तशती ग्रंथ । सावर्णिक मन्वंतरात । मार्कण्डेय सांगत । आठवा अध्याय ऐसा हा ।। ४९ ।।
।। स्वस्ति दुर्गा सप्तशती अध्याय आठवा ।। (ओवी संख्या ४९)
।। अध्याय नववा ॥
अर्धनारीश्वराते शरण । बंधुकपुष्प सुवर्णसमवर्ण । पाशांकुश वरद मुद्रा धारण । ऐसे रूप जयाचे ।।१।। तीन नेत्र अर्धचंद्र | अक्षमाळा सुंदर । देई भक्ता अभयवर । त्याते नमन करीतसे ।। २ ।। नृप म्हणे ऋषीसी । पुढे सांगावे आम्हासी । देवीने रक्तबीजासी । अद्भुत रीती मारिले ।। ३।। पुढे काय जाहले । शुंभ निशुंभाने काय केले । देवीने कैसे मारिले । ते सांगावे मजलागी ।। ४ ।। ऋषी म्हणती नृपासी । शुंभ निशुंभ क्रोधासी । न राहे सीमा परियेसी । मरण पाहून सेनेचे ॥ ५ ॥ प्रचंड सेनेसहित । देवीवरी आक्रमण करीत । शुंभ-निशुंभ ते दैत्य । चालोनी जाती देवीवरी ॥ ६ ॥ महाशर संधान होत । बाणवर्षाव होई अद्भुत । चंडिका बाण अद्भुत । छेदे सर्व शस्त्रांते ।। ७ ।। तेजस्वी खड्ग घेवोन । निशुंभ येई धावोन । सिंह देवी वाहन । त्यावरी प्रहार करीतसे ॥। ८ ।। देवी एक दिव्य बाण । सोडी निशुंभ लक्ष्योन । दिव्य खड्ग आणि ढाल तोडोन । टाकिले पाहा देवीने ।। ९ ।। आठ चंद्रकोर असत । ऐसी ढाल अद्भुत । देवीने तोडिता चकीत । दैत्य पाहा होतसे ।। १० ।। म्हणोनी एक शक्ती । सोडी तो देवीप्रती । देवी चक्र सोडिती । झाली पाहा तेधवा ।। ११ ।। शक्तीचे तुकडे होत । निशुंभ क्रोधे चिंतित । शूल गदा फेकीत । लक्ष्योनिया देवीसी ।। १२ ।। देवीचा सिद्ध त्रिशूल । भस्म करी गदा शूल । परशू घेवोनी असुर । देवीवरी धावला ।। १३ ।। जवळ येत असुर । देवी करी वज्रप्रहार । निशुंभ दैत्य धरणीवर | पडला पाहा तेधवा ।। १४ ।। देखोनी निशुंभ मूर्च्छित । शुंभ होई क्रोधित । देवीते मारावया त्वरित । धावला पाहा तेथवरी ।। १५ ।। दिव्य रथावरी बैसोन । पराक्रमी दिसे शोभायमान । त्याते येता देखोन । देवी शंख फुंकीतसे ।। १६ ।। धनुष्याचा टणत्कार । करी देवी वारंवार । सिंहही गर्जना थोर । करो लागे तेथवरी ॥ १७ ॥ महाकाली महाघोर । गर्जना करी तेथवर । कांपती पाहा असुर । म्हणती प्रलय मांडिला ।। १८ ।। शुंभाते पाहोनी सामोरी । उभा राहे म्हणे ईश्वरी । केले अत्याचार देवांवरी । त्यांची शिक्षा भोगी तू ।। १९ ।। उभे राहुनी गगनात । देवता जयजयकार करीत । म्हणती अंबे त्वरित । मारी शुंभ दैत्याला ॥ २० ॥ शुंभ क्रोधित होऊन । शक्ती सोडी अग्निसमान । प्रतिशक्ती सोडून । देवी मध्येच पाडीतसे ।। २१ ।। शुंभ भयंकर गर्जत । तीनही लोक तेणे कांपत । गर्जोनी बाण अद्भुत । सोडी देवीते लक्ष्योनी ।। २२ ।। शुंभ बाणाते देवी तोडी । देवी बाणाते शुंभ तोडी । देवा पडती कोडी । कोणी कोणाते ऐकेना ।। २३ ।। अकस्मात देवीचा शूल । भेदी दैत्याचे वक्षस्थळ । मूर्च्छित होऊन ते स्थली। पडला पाहा दैत्य तो ।। २४ || इकडे निशुंभ जागृत । होवोन आला तेथ । पाहोनी शुंभ मूर्च्छित । क्रोधे कापे थरथरा ।। २५ ।। दश सहस्त्र बाण सोडीत । देवी, काली, सिंहाते वेधीत । सर्वांते घायाळ करीत । चक्रे सोडोनी त्यावरी ।। २६ ।। दश सहस्त्र बाण चक्र । निशुंभ सोडी देवीवर । दुर्गा तेव्हा कोपोन । सोडी दिव्य शक्ती ते ।। २७ ।। दुर्गा शक्तीने चक्र बाण । सारे काढिले तोडोन । निशुंभ गदा घेवोन । देवीवरी धावला ।। २८ । खड्ग घेवोनी त्वरित । देवी गदेते तोडीत । शूल घेऊनी धावत । निशुंभ पाहा देवीवरी ।। २९ ।। शूल घेऊनी हाती । झाली वक्षस्थलाते छेदिती । अद्भुत वर्ते तेथे । ऋषी म्हणे अवधारा ||३०|| निशुंभाचे छेदिता हृदय । एक पुरुष प्रकट होय । महाबली पराक्रमी काया । येई वक्षांतूनी तो ।। ३१ ।। देवीस म्हणे तो पुरुष । उभी राहे थांब तेथ । मी आहे येथ जीवित । करी युद्ध मज सवे तू ।। ३२ ।। देवी हासोनी म्हणत । युद्धची मी आहे करीत । हाती खड्ग घेत । शिर करी धडा वेगळे ।। ३३ ।। सिंह देवी वाहन । करी पराक्रम दारुण । सहस्त्रावधी दैत्य मारोन । टाकिले पाहा तयाने ।। ३४ ।। काली आणि शिवदूती । लक्षावधी दैत्य खाती । कौमारी दैत्या मारिती । झाली अनेक तेधवा ।। ३५ ।। मंत्रजल ब्रह्माणीचे । तेज सत्त्व हरे दैत्यांचे । सोडोनिया रणाते । पळून जाती अवधारा ।। ३६ ।। माहेश्वरीचा महात्रिशूल । फोडी दैत्यांचे वक्षस्थळ । सहस्त्रावधी दैत्यदळ । मारिले पाहा देवीने ।। ३७।। कित्येका वाराहीने मारिले । वैष्णवीने तुकडे केले । ऐन्द्रीने वज्रे छेदिले । किती एक पाहा दैत्यासी ॥ ३८ ॥ काली शिवदूती भक्षित । सिंह फाडोनी खात । ऐसे परी होत । रणामाजी तेधवा ।। ३९ ।। निशुंभ वध या अध्यायात । ऋषी नृपाते सांगत । शुंभ वध पुढील अध्यायात । ऋषी सांगती नृपाते ।। ४० ।। मार्कण्डेय पुराणात । देवी माहात्म्य कथानक । मन्वंतर सावर्णिक । नववा अध्याय गोड हा ॥ ४१ ॥
।। स्वस्ति दुर्गा सप्तशती अध्याय नववा ।। (ओवी संख्या ४१)
।। अध्याय दहावा ॥
श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नमः । ॐ ऐम् हीम् क्लीम् चामुण्डायै विच्चे । भगवती कामेश्वरी । अर्धचंद्र जिचे शिरी । शिवशक्ती स्वरूप ईश्वरी । तिते नमन करीतसे ॥ १ ॥ आरक्त सूर्या सम वर्ण । सूर्य चंद्र अग्नि हे त्रिनेत्र । पाशांकुश शूल मनोहर । करी धरिले जियेने ।। २ ।। ऐशा भगवतीचे करोनी ध्यान । ऋषी म्हणती नृपा लागोन । निशुंभाते मृत देखोन । शुंभ क्रोधे म्हणतसे ॥ ३ ॥ दुष्ट दुर्गे तू करोनी घात । वधिले माझ्या बंधुप्रत । परी जरी असेल हिंमत । एकली लढे मज सवे ।। ४।। देवी म्हणे तू महादुष्ट । मी एकलीच आहे समर्थ । मजविण या त्रैलोक्यात । काही दुसरे असेचिना ।।५।। परी जरी तू म्हणत । तरी या ज्या माझ्या विभूती असत । मज अंतरी प्रवेशत । तुझ्या इच्छे कारणे ।। ६ ।। ऐसे म्हणता अंबिका । देवता लीन झाल्या देखा । ब्रह्माणी आदी समस्ता । देवी शरीरी प्रवेशल्या ।। ७ ।। एकली राहे देवी । म्हणे दैत्याते पाही । माझे ऐश्वर्य शक्तीही । सारे पाहा समेटले ।। ८ ।। चल आता युद्ध कर । दावी पराक्रम सत्वर । ऐसे म्हणोनी भयंकर । बाणवर्षाव करीतसे ।। ९ ।। देवीचे सारे बाण । दैत्ये टाकिले मोडून । दैत्याने जे सोडिले बाण । देवी तोडूनी टाकीतसे ।। १० ।। दुर्गा हुंकार शब्द करीत । तेणे शस्त्र-अस्त्र नष्ट होत । म्हणोनी दिव्य अस्त्र सोडीत । परमेश्वरीवर तेधवा ।। ११ ।। दैत्याची दिव्यास्त्रे सर्व । हुंकारे दुर्गा भस्म करीत । धनुष्य त्याचे तोडीत । दिव्य बाणाते सोडोनिया ।। १२ ।। शुभ शक्ती सोडीत । तीही दुर्गा तोडीत । ढाल तलवार घेई दैत्य । दुर्गे लागी माराया ||१३|| देवी सोडी तीक्ष्ण बाण ढाल तलवार जाई मोडून । अश्वसारथी धनुष्य जाण । तेही कापून टाकीतसे ||१४|| दैत्य मुद्गल घेवोनी धावत । देवी तेही मोडूनी टाकीत । दैत्य मुष्टिप्रहार करीत । देवी वक्षी तेधवा ।। १५ ।। दुर्गेनेही मुष्टि प्रहार । केला दैत्याचे छातीवर । रक्त ओकीत भूमीवर । काही क्षण पडला तो ॥१६॥ परी क्रोधे उठत । स्वहस्ते देवीसी धरीत । आकाशी उडोनी जात । सांगाते घेऊनी देवीसी ।।१७।। आकाशी युद्ध दोघांचे । नवल वाटे ऋषी मुनी । म्हणती हे अद्भुत साचे | प्रथमची आम्ही पाहतसो ॥ १८ ॥ शुंभाते करी उचलला । गरगरा फिरवोनी फेकिला । पृथ्वीवरी आपटला । पाहा दुर्गा देवीने ।। १९।। परी तो सवेचि उठोन । धावे दुर्गा लक्षोन । तव त्रिशूले वक्ष भेदून । देवी त्याचे टाकीतसे ॥२०॥ जैसा भूकंप होत । तैसी पृथ्वी कापत । शुंभ दैत्य पडत । तैसा जाणा भूवरी ।। २१ ।। दैत्य मारिला देखोन । विश्व होई प्रसन्न । स्वच्छ दिसे गगन | शांती सर्वत्र होतसे ||२२|| नद्या निर्मळ वाहू लागत । मेघ आनंदे वर्षत । देवता हर्षभरीत । गाऊ लागले तेधवा || २३ || गंधर्व आनंदे गाती । अप्सरा हर्षे नृत्य करिती । वायू वाहे प्रसन्न गती । पृथ्वीवरी तेधवा ॥ २४ ॥ सूर्य पवित्र किरणे सोडीत । यज्ञशाळा होती प्रज्वलित । दिशा झाल्या प्रशांत । प्रसन्न झाले सर्वही ।। २५ ।। दुर्गा सप्तशती ग्रंथ । दहा अध्याय वर्णिले येथ । ऋषी म्हणे नृपाप्रत । ऐसे माहात्म्य देवीचे ॥ २६॥
।। स्वस्ति दुर्गा सप्तशती अध्याय दहावा ।। (ओवी संख्या २६)
|| अध्याय अकरावा ॥
श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः । ॐ ऐम् व्हीम् क्लीम् चामुण्डायै विच्चै । उदित सूर्यासमान । जिची अंगकांती महान । अर्धचंद्र मुकुट जाण । भाळी जिच्या मिरवीतसे ।। १ ।। तीन नेत्र सुहास्य वदन। सौंदर्याची जी खाण । वरद अभय पाशांकुश मुद्रा पूर्ण । सदैव रक्षी भक्तासी ।। २ ।। त्या भुवनेश्वरीते वंदन । प्रथम तिचे करून ध्यान । पुढील कथा सांगेन । ऋषी म्हणती रायासी ।। ३ ।। महादैत्याधिपती शुंभ होता मृत। देवीचा जयजयकार करीत । पातले सर्व देव तेथ । जेथे होती जगदंबा ।। ४ ।। अग्निते पुढे करोन । देवीचे करिती स्तवन । सर्वही प्रसन्नवदन । होते पहा तेधवा ।। ५ ।। जगन्माता व्हावे प्रसन्न । विश्वेश्वरी व्हावे प्रसन्न । करावे विश्वाचे रक्षण | विश्व आधीन तुझ्या असे ।। ६ ।। तू जगतासी आधार । पृथ्वी तव रूप साचार । जलरूपे तू समग्र । तृप्ती देसी जगताते ।। ७ ।। तू वैष्णवी पराक्रमी । विश्वबीज तू विश्वस्वामिनी । तू माता जगन्मोहिनी । मोहून ठेवी सर्वाते ।। ८ ।। तू होता प्रसन्न । भक्ताते मोक्ष प्राप्त । होवोनी ईश्वरासी युक्त । सदासर्वदा राहे तो ॥। ९ ॥ विद्या सर्व तुझी रूपे । स्त्रिया सर्व तुझी रूपे । तू व्यापक विश्वाते । कोण स्तवो शके तुज ॥ १० ॥ सर्व व्यापक देवी । स्वर्गमुक्ती प्रदायिनी । याहूनी स्तवन वचनी । काय आणि ते सांगावे ।। ११ ।। सर्वांसी बुद्धी तू देसी । हृदयी सर्वांच्या राहसी । स्वर्ग – मोक्ष प्रदान करिसी । नारायणी नमोस्तुते ।। १२ ।। परिणाम परिवर्तन । हेची तुझे स्वरूप प्रमाण । विश्वातीत चैतन्य । नारायणी नमोस्तुते ।। १३ ।। सर्व मंगलाचेही मंगल । सर्व इच्छा करिसी पूर्ण । गौरी त्र्यंबके शरण । नारायणी नमोस्तुते ।। १४ ।। सृष्टी स्थिती विनाश शक्ती। सनातन तू दिव्यशक्ती । सर्व गुणातीत गुणमयशक्ती । नारायणी नमोस्तुते ।। १५ ।। दीन शरणागताचे रक्षण | ब्रीद तुझे परित्राण । करिसी दुःखाचे हरण । नारायणी नमोस्तुते ।। १६ ।। हंसयुक्त विमानात । ब्रह्माणी रूपे राहत । कुशयुक्त जल सिंचित । नारायणी नमोस्तुत ।। १७।। त्रिशूल हाती माथा चंद्र । महावृषभावरी बैसत । माहेश्वरी या रूपात । नारायणी नमोस्तुते ।। १८।। मयूर कुक्कुट वेष्टीत । महाशक्ती धारण करीत । कौमारी या रूपात । नारायणी नमोस्तुते ।। १९।। शंख चक्र गदा धरीत । शारंग हाती धरीत । वैष्णवी या रूपात । नारायणी नमोस्तुते ।। २० ।। महाचक्र हाती धरीत । वसुंधरा दाढे उचलत । वाराही या रूपात । नारायणी नमोस्तुते ॥ २१ ॥ त्रैलोक्याचे करी रक्षण। दैत्यांचे करी हनन । नारसिंही या रूपात । नारायणी नमोस्तुते ।। २२ ।। हाती महावज्र धरीत। सहस्त्र नयन प्रज्वलित । ऐन्द्री वृत्रप्राण हरित । नारायणी नमोस्तुते ।। २३ ।। दैत्य सेनेचा संहार करीत । भयंकर रूप धरीत । शिवदूती या स्वरूपात । नारायणी नमोस्तुते ॥ २४ ॥ विक्राळ उग्र दिसत । विकट गर्जना करीत । चामुण्डा या रूपात । नारायणी नमोस्तुते ।। २५ ।। लक्ष्मी लज्जा महाविद्या। श्रद्धा पुष्टी अविद्या । राही विविध रूपात । नारायणी नमोस्तुते ।। २६ ।। मेधा श्रेष्ठ ऐश्वर्या । सर्व विश्वाची अधिष्ठाता । सरस्वती या रूपात । नारायणी नमोस्तुते ॥ २७ ॥ सर्वेश्वरी सर्व रूपात। सर्वशक्ती सर्व भय हरित । दुर्गा देवी रूपात । नारायणी नमोस्तुते ॥ २८ ॥ तीन नेत्रांनी शोभत । सर्व भयापासून रक्षत । कात्यायनी या रूपात । नारायणी नमोस्तुते ।। २९ ।। भयंकर ज्वाला ओकीत । ऐसा त्रिशूल हातात । भद्रकाली या रूपात । नारायणी नमोस्तुते ॥ ३० ॥ दुष्ट कर्मापासून । माता रक्षी पुत्रा लागोन । तू करी तैसे रक्षण । पापापासून आमुचे ||३१|| असुरांचे करूनी हनन । तुझे खड्ग झाले पावन । चण्डिके करी कल्याण । नमन तुते करीतसो ।। ३२ ।। तू होता प्रसन्न । जाती सर्व रोग आपदा पळोन । तुझा आश्रित होता जाण । आश्रित त्याचे जग होई ||३३ ॥ धर्मद्रोही महादैत्य। अनेक रूपाने त्याते मारीत । ऐसे कोण करीत । विश्वामाजी तुझेविना ।। ३४ ।। तुझ्याविण ऐसी कवण शक्ती । जी जीवांते भ्रमविती । वेदांमध्ये तुझी ख्याती । वर्णिली ऐसी आहे हो ।। ३५ ।। यक्ष राक्षसापासून । विष सर्पापासोन । शत्रू ठगांपासून । रक्षी दुर्गे आम्हाते ॥ ३६ ॥ विश्वेश्वरी विश्वाचे पालन । विश्व सर्व तव आधीन । तुझ्या चरणी नम्र । राहो आम्ही सर्वदा ।। ३७ ।। देवी प्रसन्न व्हावे । सदैव आम्हाते रक्षावे। जगताचे पाप हरावे । म्हणोनी आम्ही प्रार्थितो ।। ३८ ।। विश्व दुःख हरित । आम्ही तव शरणागत । त्रैलोक्यवासिनी दुर्गा देत । वर प्रदान देवांना ।। ३९ ।। देवी म्हणे मी प्रसन्न । मागा आता वरदान । जेणे जगाचे कल्याण । होईल ऐसे मागावे ।। ४० ।। सर्व बाधा निवारी । शत्रूंचा नाश करी । त्रैलोक्यवासी ईश्वरी । वर देई आम्हाते ॥ ४१ ॥ हेची कार्य राही करत । एवढे देई आम्हा प्रत। तिन्ही लोका ठेवी शांत । ऐसे करी दुर्गे तू ॥ ४२ ॥ | ऐकोनी देवांचे वचन । देवी म्हणे तया लागोन । वैवस्वत मन्वंतरात जाण । आता येईन मी पुन्हा ॥ ४३ ॥ ते अठ्ठाविसावे युग असेल । शुंभ निशुंभ पुन्हा येतील। मी नंद गोप यशोदा गृही प्रकटेन । करण्या नाश असुरांचा ॥ ४४ ॥ तद्नंतर पुनश्च । अवतरेन मी परत । नाश करीन वैप्रचित । रक्तदंतिका म्हणोनिया ।। ४५ ।। पुढे भविष्यकाळात । अवर्षण भयंकर पडत। तेव्हा प्रकटोनी यथार्थ । ऋषी रक्षा करेन मी ॥ ४६ ॥ शत नेत्रांनी ऋषींसी । पाहोनी रक्षीन त्यांसी । शताक्षि नाम मजसी । पडेल तेव्हा निर्धारि ।। ४७ ।। शाक उत्पन्न करोन । देईन जना जीवन। शाकंभरी नाम म्हणोन । पडेल मजला निर्धारि ।।४८ ।। तैसेची त्या अवतारात । दुर्गम दैत्याते वधत। दुर्गा नामे ख्यात । होईन तेव्हापासोनी ।। ४९ ।। भीमरूप करोनी धारण । हिमालयी पर्वती राहून। राक्षसांते भक्षीन । ऋषीमुनी ते रक्षाया ।। ५० ।। भीमादेवी म्हणोन । ख्याती तव मी पावेन । मुनी करिती स्तवन । नतमस्तक होवोनिया ।। ५१ ।। अरुण नामे दैत्य । लोका उपद्रव करीत । ऐसे होईल जगाप्रत । भविष्यकाळी जाणावे ॥५२ ।। तेव्हा भ्रामरी रूपात । मी होईन प्रकट । भ्रमररूपे नाश करीन। त्या असुराचा निश्चये ॥ ५३ ॥ भ्रामरी देवी म्हणोन । लोक करतील पूजन । ऐसे देई वचन। दुर्गा सर्व देवांते॥ ५४ ॥ या व्यतिरिक्त आणिक । माजती जेव्हा दैत्य । अवतार घेवोनी निश्चित। मारेन त्यांना निश्चये ॥ ५५ ॥ ऐसे सांगोनी देवी । पाहा गुप्त जाहली । जयजयकार देव करिती । उदयोस्तु अंबे म्हणोनिया ॥ ५६ ॥ ऋषी म्हणे नृपासी । एकादश अध्यायासी । पठणे भोग मोक्षासी । प्राप्त होई निश्चये ॥ ५७ ॥
।। स्वस्ति दुर्गा सप्तशती अध्याय अकरावा ।। (ओवी संख्या ५७)
।। अध्याय बारावा ॥
श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । ॐ ऐम् हीम् क्लीम् चामुण्डायै विच्चे । विद्युल्लतेसमान रूप। सिंहवासिनी त्रिनेत्र । खड्ग, ढाल, पाश, चक्र | हाती धरीले जियेने ॥ १ ॥ माथी शोभे चंद्रकोर। रूप दिसे भयंकर । सर्व देवांचा अवतार । ऐसे रूप दुर्गेचे ।। २ ।। हाती ढाल तलवार । घेऊनी कन्या सभोवार । युद्धालागी तत्पर । अंगविभूती जियेच्या ।। ३ ।। दुर्गा महापरमेश्वरी । ब्रह्मांड व्यापक अखिलेश्वरी । ललिता राजराजेश्वरी । वर देतसे ग्रंथाला ।। ४ ।। म्हणे या ग्रंथातील स्तुती । जे नित्य पठण करिती। त्यांच्या सर्व आपत्ती । निवारीन मी निश्चये ॥ ५ ॥ पूर्ण ग्रंथ करता पठण । त्याचे होईल कल्याण । इह सौख्य परत्र साधन । होईल जाणा निश्चये ॥ ६ ॥ मधुकैटभाचा संहार । मी वधिला महिषासुर । शुंभ निशुंभ असुर। कैसे वधिले रणामाजी ॥ ७ ॥ या प्रसंगाचे पठण । जे करिती भक्तजन । त्यांचे मनोरथ पुरवीन । वरदान देईन मी त्याते ॥ ८ ॥ ग्रहपीडा न बाधती । पापे त्यासी न लागती। दूर संकटे होती । पठण मात्रे ग्रंथाच्या ।। ९ ।। दारि जाई पळोन । नष्ट होईअज्ञान । प्राप्त होती सद्गुण । पठण मात्रे ग्रंथाच्या ।। १० ।। शतपाठ करिता पूर्ण । अपार लाभे पुण्य । होतील सर्व इच्छा पूर्ण । पठण मात्रे ग्रंथाच्या ।। ११ ।। सहस्त्र आणि एकशत । इतुके पाठ जो करीत । प्रसन्न होऊनी त्याप्रत । ध्यानी दर्शन देईन मी ।। १२ ।। अष्टमी चतुर्दशी नवमी । पठण करावे या दिनी । पाप सर्व जळोन । जाईल जाणा निश्चये || १३ || सदैव माझे भक्त । राहतील आनंदात । विरह दुःख कधी न होत । मम भक्तांसी निश्चये ।। १४ ।। त्यासी नाही शत्रू भय । त्यांसी नाही राजभय । शस्त्र, अस्त्र, अग्नि भय । त्यासी नाही निश्चये ।। १५ ।। त्यासी नाही चोर भय । मार्गी नाही लूट भय । जगदंबा रक्षिती होय । सर्व बाजूंनी सर्वदा ।। १६ ।। त्यासी नाही जल भय । नाही त्यासी अरण्य भय। व्याघ्र सर्प विष भय । नाही त्यासी निश्चये ।। १७ ।। म्हणोनी भक्तीपूर्वक । ग्रंथ पठण राहावे करीत । स्वये दुर्गा सिद्ध करीत । महा ग्रंथ म्हणोनिया ।। १८ ।। परम कल्याणकारक ग्रंथ । त्रिविध तापाते हारित । रोग व्याधी समस्त । पठण मात्रे नष्ट होती ।। १९ ।। ज्या देवी मंदिरात । या ग्रंथाचे पठण होत। तेथे राही मी नित्य । म्हणोनी दुर्गा सांगतसे ॥ २० ॥ ज्या गृही ग्रंथपठण । मी तेथे राही जाण । सर्व विपत्ती निवारीन । सुखी ठेवीन भक्तासी ॥ २१ ॥ भक्ती दान होम हवन । मज करिती जे समर्पण । त्यावरी संतोषोन । वरदान त्याते देईन मी ।। २२ ।। शारदीय नवरात्रात । जे भक्तीने पठण करीत । आपदांतून मुक्त होत । सर्व बाजूंनी सर्वदा ।। २३ ।। माझे माहात्म्य करिता श्रवण । श्रवण करिता मम पराक्रम । मनुष्य निर्भय होवोन । सुखी होईल सर्वदा ॥ २४ ॥ या ग्रंथाचे पठण करीत । शत्रू त्यांचे नष्ट होत । सुख सर्व होई प्राप्त । पठण मात्रे ग्रंथाच्या ।। २५ ।। अशांत मने होती शांत । दुःस्वप्ने त्यासी न बाधत । पीडा सर्व ग्रहजनीत । पठण मात्रे नष्ट होती ।। २६।। बालकाते बालग्रह न पीडित । मैत्री राहे अतूट । सौजन्य वाढे सर्वत्र । ऐसे माहात्म्य ग्रंथाचे ।। २७ ।। पिशाच्च, राक्षस, भूत । पठण मात्रे पळून जात । सर्व आपदा होती शांत । पठण मात्रे ग्रंथाच्या ।। २८ ।। एक वर्ष देवता पूजन । एक वर्ष करिता दान । जे फळ होई निर्माण । ग्रंथ पठणे ते मिळे ॥२९॥ एकदा करिता श्रवण । पाप जाई जळोन । देवी आरोग्य प्रदान । करी त्या भक्तासी निश्चये ।। ३० ।। रात्री सूक्त, देवी सूक्त। नारायणी स्तुती महाख्यात । या स्तोत्राते जो पठण करीत । त्यासवे राहे मी सदा ।। ३१ ।। त्यासी नाही व्याघ्र भय । त्यासी नाही शत्रू भय । सिंह, गज, सर्प भय । नाही त्यासी सर्वदा ।। ३२ ।। नाही त्यासी राज भय । नाही त्यासी चोर भय । नाही त्यासी युद्ध भय । रक्षी त्याते सर्वदा ।। ३३ ।। कोणी बैसोनी नावेत । महासागरी प्रयाण करीत । पडे चक्रवातात । नाव बुडो लागतसे।। ३४ ।। अथवा भयंकर युद्धात । शस्त्रप्रहार होत । पिशाच्च बाधेने पीडित । महाव्यथेने पीडितसे ।। ३५ ।। ऐसे काही असो कारण । करावे या ग्रंथाचे स्मरण । विपत्ती कितीही महान । सुटे भक्त त्यातूनीया ।। ३६ ।। करिता फक्त स्मरण । विपत्ती पळती जाण । शत्रू आणि जीव हिंस्त्र । पळती पाहूनी भक्ताते ।। ३७ ।। ऐसे ग्रंथासी वरदान । देई दुर्गा चंडिका जाण । आणि पावे अंतर्धान । हिमालयामाझारी ।। ३८ ।। निर्भय होवोनी समस्त । देव आपुले कार्य करीत । पृथ्वी झाली शांत । यज्ञ यागे करोनिया ।। ३९ ।। रणांगणी जे पळत । उरले असुर जे असत । ते पाताळी लपत । जावोनी राहती तेथवरी ।। ४० ।। ऋषी म्हणे नृपासी । भगवती जगदंबा परियेसी । जगत् रक्षण्या कारणासी । पुन्हा पुन्हा प्रकटतसे ।। ४१ ।। हे विश्व तिच्या आधिन । ती करी विश्व निर्माण । भक्ता सुख समाधान । देवोन सुखी ठेवीतसे ।। ४२ ।। प्रलयकाळ जव होत । महाकाली प्रकटत । विश्वसंहार करीत । ऐसे माहात्म्य दुर्गेचे।। ४३ वाढता पापाचा भार। तीच करीतसे संहार । विश्व व्यापोनी सर्वत्र | खेळ खेळी जगदंबा ।। ४४ ।। मनुष्य वर्तता सात्त्विक । देई सौभाग्य तयाप्रत । अहंकार गर्व करीत । दारिद्र्य पाठी लावीतसे ।। ४५ ।। ऐसी दुर्गा परमेश्वरी । प्रकटली जाणा भूवरी । तिते पूजीता सत्वरी । सौख्य प्राप्ती होतसे ॥। ४६।। मार्कण्डेय पुराण । सावर्णिक मन्वंतर जाण । देवी माहात्म्ये फलश्रृती पूर्ण | द्वादशोध्याय गोड हा ॥ ४७ ॥
।। स्वस्ति दुर्गा सप्तशती अध्याय बारावा ।। (ओवी संख्या ४७)
॥ अध्याय तेरावा ॥
श्री गणेशाय नमः । ॐ ऐम् व्हीम् श्रीम् क्लीम् परमेश्वरी स्वाहा । बालसूर्यासमान आरक्त । ऐसे तेज अद्भुत । चतुर्भुज त्रिनेत्र मुकुट । अर्धचंद्राकार जो ।। १ ।। पाशांकुश हाती धरीत । अभय वरद मुद्रा असत । ऐशा ‘शिवा’ देवीते ध्यात । राहावे सदा सर्वदा ।। २ ।। ऋषी म्हणती रायासी । देवी चरित्र तुजसी । सांगितले परियेसी । फलश्रृती सहीतजे ।। ३ ।। ती ब्रह्मांडा कारण । विष्णुमाया तीच जाण । तिचे कारणे मोहून । जग संपूर्ण जातसे ।। ४ ।। त्या परमेश्वरीसी शरण । मनोभावे जावे आपण । ती ते आराधिता संपूर्ण । सुख त्रैलोक्या होतसे ।। ५ ।। भोग, मोक्ष, ज्ञान, शक्ती । देवीकृपे प्राप्त होती । म्हणोनी आता एकचित्ती । स्मरण करावे दुर्गेचे ।। ६ ।। ऐकोनी मुनीचे वचन । सुरथ समाधी करिती नमन । विरक्त मनी होऊन । तप आचरिते जाहले ।। ७ ।। श्री जगदंबा प्रीत्यर्थ । उभयता तप करू लागत। देवी सूक्ताचे करीत । पाठ जाणा दोघेही ।। ८ ।। काही दिवस गेल्यावर । करू लागले निराहार । बैसोनी एका आसनावर । ध्यान करिती ते देखा ।। ९ ।। तीन वर्षे ऐसे करीत । दुर्गा चण्डिका प्रसन्न होत । म्हणे मागा निश्चिंत । वर देण्या आले मी ॥ १० ॥ नृप मागे गत राज्य । तैसेची भविष्य जन्मी राज्य। देवी तथास्तु म्हणत । दिले वरदान त्यालागी ।। ११ ।। वैश्य होऊनी विरक्त | देवीसी म्हणे मजप्रत । आत्मज्ञान देऊनी चित्त । शुद्ध माझे करावे ।। १२ ।। देवी म्हणे नृपासी। दिले वचन तुजसी । तू जिंकीसी शत्रूसी । राज्य स्थिर राहे तुझे ।। १३ ।। सावर्णिक मनु म्हणून मिळे पुढे तु जन्म। चक्रवर्ती राजा म्हणोन । ख्याती पावसी निश्चये ।। १४ ।। देवी म्हणे वैश्यासी । तू जाशील मोक्षासी । आत्मज्ञान तुजसी । प्राप्त जाणा होईल ।। १५ ।। मार्कण्डेय म्हणे सावधान । संपले देवी आख्यान। देवी पावली अंतर्धान । वर देवोनी दोघांसी ।। १६ ।। श्री मार्कण्डेय पुराण । सावर्णिक मन्वंतर जाण। देवी माहात्म्य संपूर्ण । झाले पाहा येथवरी ।।१७।। हा तेरावा अध्याय । येथे संपले पुराण । वैश्य सुरथा वरदान । प्राप्त येथे जाहले । १८ ॥
।। स्वस्ति दुर्गा सप्तशती अध्याय तेरावा ।। (ओवी संख्या १८)
॥ प्राधानिक रहस्यम् ॥
सप्तशती रहस्य त्रयासी । नारायण ऋषी परियेसी । अनुष्टुप् छंद फलप्राप्तीसी । जपे विनियोगा म्हणावे ।। १ ।। महालक्ष्मी महासरस्वती । महाकाली दुर्गा भगवती । यांची व्हावया कृपाप्राप्ती । पठण करावे ग्रंथाचे॥ २ ॥ नृप म्हणे ऋषीसी । देवी माहात्म्य आम्हासी । सांगोनिया परियेसी । उपकार केला बहु जाणे ।। ३ ।। आता सांगावे मजप्रत । प्रधान प्रकृती रूपाप्रत । कैसे आराधावे देवीप्रत । ते मज सांगा गुरुवर्या ।। ४ ।। ऋषी म्हणती राजासी । बरवा प्रश्न पुसिलासी । परी हे रहस्य सर्वांसी । सांगो नये सर्वथा ।। ५ ।। महालक्ष्मी परमेश्वरी । आदिकारण ईश्वरी । दृश्य अदृश्य अखिलेश्वरी । भरोनी राहे विश्वाते ।। ६ ।। सुवर्णासम कांती । शून्यातून जिची उत्पत्ती । सुवर्णालंकार अंगावरती । उत्कृष्ट रूप तियेचे ।। ७ ।। ती शून्याते देखत । म्हणे उत्पन्न करावे वस्तू जात । तमोगुणात्मक चिंतित । महाकाली ते प्रकटाया।। ८ ।। महामाया महाकाली। ऐसी प्रकट जाहली । रुंडमाळा गळा घातली । अलंकार म्हणोनिया ।। ९ ॥ महालक्ष्मीसी करूनी नमन । पुसे का पाचारिले म्हणोन । येरी म्हणे विश्व आपण। निर्माण केले पाहिजे ।। १० ।। क्षुधा, तृषा आणि निद्रा । तमोगुणी प्रवृत्ती आपदा । उतरावया पाप भारा । करणे लागे युद्धासी ।। ११ ।। ऐसे तुझे कार्य बहुत । जे गर्व अहंकार करीत । त्याते पाडी आसक्तीत। मोहुनी टाकी तयांना ।। १२ ।। ऐसे सांगोनी तिसी । शुद्धसत्त्व गुणेसी । धारण करी रूपासी । वीणापाणि असे जी ।। १३ ।। शुभ्र वस्त्र नेसली । पुस्तक वीणा हाती धरली । सरस्वती बुद्धी प्रकटली। ऐसी पाहा तेधवा ।। १४ ।। तिते महालक्ष्मी म्हणत । जे सद्गुणमंडित । ईश्वर, भक्त, गायन, संगीत । ऐशा लोका पाही तू ।। १५ ।। नृत्य गायन वादन । कवित्व लेखन विद्या साधन। हे सर्व तव आधीन । राहे जाणा निश्चये ।। १६ ।। जे असती विरक्त । ज्ञान, ब्रह्म इच्छित । त्यासी कृ करोनी त्वरित । परमार्थ त्यांचा करावा ।। १७ ।। ऐसे असे तुझे कार्य । सात्त्विक शुद्ध मोक्षाप्रत । नेणे मम भक्तांप्रत । ज्ञान दान करोनिया ।। १८ ।। महाविद्या वाणी सरस्वती । ब्राह्मी कामधेनु भारती । वेदगर्भा बुद्धी मती । ऐशा स्वरूपे वर्तावे ।। १९ ।। महालक्ष्मी म्हणे त्याते । आता निर्मुनी युगुलाते । या विश्व रहाटाते । पुढे आपण चालवू ।। २० ।। ऐसे म्हणोनी तिघांनी । युगुला निर्मोनी । विश्वरचना आरंभोनी । विश्व निर्माण केले हे ॥ २१ ॥ निलकंठ श्वेतशरीर । मस्तकी जाणा चंद्रकोर । ऐसा निर्मिला शंकर । तये वेळी तेधवा ।। २२ ।। त्याची अर्धांगिनी अक्षरा । तीच ईश्वरी महेश्वरा अर्धनारीश्वर ईश्वरा । ऐसी जोडी जाहली ।। २३ ।। महासरस्वती सत्तेने । जे युग्म होई निर्माण । श्वेतवर्ण स्त्री पुरुष श्यामवर्ण। ऐसा निर्माण करी देखा ॥ २४ ॥ विष्णू, कृष्ण, ऋषिकेश । वासुदेव जनार्दन । उमा, गौरी, सती, चंडी । ऐसी नावे युग्मांची ।। २५ ।। स्त्रीतेची पुरुष असत। पुरुष तेची स्त्री होत । निराकार साकार होत । ऐसी धरली रूपे देखा ।। २६ ।। ऐशा रूपाते धरोन । केले विश्व निर्माण । यातील रहस्य जाण । ज्ञाननेत्री जाणावे ॥ २७ ॥ याहूनी काही आणिक । लिहिणे न योग्य होत । क्षमा प्रार्थना देव समस्त । लिखाण बंद करीतसे ॥ २८ ॥ महालक्ष्मी महाकाली महासरस्वती। महाविष्णू महादेव परब्रह्मस्थिती । या गूढाते जाणती । ब्रह्मस्थितीते पावावया ॥ २९ ॥ याचे न होई वर्णन । प्राधानिक रहस्य जाण । निराकार साकार येथोन । निर्माण पाहा जाहले ।। ३० ।। ऐसे देवता रहस्य । जाणोनी सर्व अद्भुत । श्री दत्त दावूनी संकेत । पूर्ण येथे करीतसे ॥ ३१ ॥
॥ स्वस्ति प्राधानिक रहस्यम् ॥
॥ वैकृतिक रहस्यम् ॥
त्रिविधा शक्ती मुख्य । रज तम सात्त्विक । महालक्ष्मीची रूपे प्रकट । होती तीन जाण पा ॥ १ ॥ विविध नामे त्या मिळत । कार्याकारण भेद असत । शर्वा शिवा चण्डिका म्हणत । सर्व रूपे दुर्गेची ॥ २ ॥ जी विष्णूची योगनिद्रा । तीच महाकाली भद्रा । ब्रह्मा स्तवी जागृता । करणे म्हणोनी तिजलागी ॥। ३ ।। मधु कैटभाते करावे हनन । ब्रह्मा स्तवी म्हणोन । महाकालीची माया पूर्ण । दुस्तर असे तरावया।। ४ ।। सर्व देवतांमधून तेज निघत । तेणे जी स्त्री होत । महालक्ष्मी मूळ म्हणत । त्रिगुणात्मक प्रकृती ।। ५ ।। ती ते नवदुर्गाही म्हणत । मूर्तीसी अठरा हात । विविध आयुधे शोभत । अठरा हाता माझारी ।। ६ ।। बाण खड्ग गदा कमळ । परशू शंख घंटा त्रिशूळ । पाश शक्ती धनुष्य कमळ । ऐसी विविध आयुधे ती ॥ ७ ॥ पान पात्र दंड ढाल । वज्र हाती अक्षमाळ । कमलासनी निर्मळ । परमेश्वरी राही ती ।। ८ ।। ऐसी ते परमेश्वरी । सर्व ईश्वरांची ईश्वरी । तिते ध्याता अंतरी । सिद्ध आत्मा होतसे ।। ९ ।। सत्त्वगुण आश्रित । पार्वती देही प्रकटत । तिते सरस्वती म्हणत । अष्टभुजा देवी ती ।।१०।। बाण चक्र शूल । घंटा धनुष्य मुसळ । शंख आणि त्रिशूल । ऐसी आयुधे तियेची ।। ११ ।। तिचे करिता ध्यान । सर्वज्ञता करी प्रदान । ऐसी महत्त्वपूर्ण । तीन रूपे ही दुर्गेची ।। १२ ।। या तिन्ही रूपांचे अर्चन । पद्धती असे भिन्न भिन्न । ते नीट समजोन । घ्यावे गुरू पासोनिया ।। १३ । ते सर्व सिद्धी साधन । प्राकृत ग्रंथी नये म्हणोन । श्री दुर्गेते प्रार्थन । गुप्त जाणा ठेवीतसे ।। १४ ।। सांप्रत कली दारुण । वर्ते पाहा जगी पूर्ण । पाच सहस्त्र एक शत वर्षे पूर्ण । झाली असती कलीची ।। १५ ।। ऐशा या कलियुगात । देवता भक्तीने प्रसन्न होत । म्हणोनी तंत्रसाधन गुप्त । ठेविले असे येथे हो ।। १६ ।। हा अपराध म्हणोन । प्रार्थी क्षमा देवी लागोन । उदार हृदयी ती पूर्ण । सारे काही जाणत ।। १७ ।। म्हणोनी प्रधान रहस्य । तैसेची वैकृतिक रहस्य । आणि मूर्तिरहस्य । गरज नाही वाचण्याची ।। १८ ।। त्रयोदश अध्यायापर्यंत । पठण करावा हा ग्रंथ । भक्तिपूर्वक जरी वाचत । इच्छा पूर्ण होतसे ।। १९ ।। दुर्गा सर्व लोकेश्वरी । देवालागी महेश्वरी । जगताची परमेश्वरी । प्रसन्न आता व्हावे तू
।। स्वस्ति वैकृतिक रहस्यम् ।।
॥ मूर्तिरहस्य ॥
ॐ नंदा भगवती नाम। भविष्यात होई निर्माण । तिचे करिता पूजन | त्रैलोक्य आधीन होतसे ।। १।। कनक कांती दिव्य मूर्ती । सुवर्ण वस्त्र धारण करे ती । सुवर्ण प्रभा फाकती। ऐसे रूप जियेचे ।। २ ।। चार हात श्रीप्रसन्न वदन । अंकुश पाश कमळ शंख । सुवर्ण कमळाचे आसन । ऐसे रूप जियेचे ।। ३ ।। देई आनंद भक्तांप्रत । म्हणोनी नंदा नाम घेत । ऐसी पुढे प्रकट । होणार आहे देवी ती ।। ४ ।। या मूर्तिरहस्यात । काही गुज ऐसे असत । जे प्रकट करणे प्रस्तुत । होणार नाही या ग्रंथी ।। ५।। म्हणोन देवीसी प्रार्थन । मूर्तिरहस्य ठेविले जाण । ती करुणामयी पूर्ण । अंतराते जाणतसे ॥ ६ ॥ दुर्गा, लक्ष्मी, शिवा, शांता । सरस्वती, अपराजिता । पार्वती, जगदंबा माता । ग्रंथामाजी राही तू ॥ ७॥ माहेश्वरी, परमेश्वरी । अखिलेश्वरी, निखिलेश्वरी । सर्व ईश्वरांची ईश्वरी | ग्रंथामाजी राही तू ।।८ ।। परब्रह्म परमात्मा । चैतन्य विराट स्वरुपात्मा । सर्व शक्तींचा मूळ आत्मा । ग्रंथामाजी राहे तू ।। ९ ।। मार्गशीर्ष शुक्ल पक्षात । अनुवाद हा प्राकृत । होई पाहा समाप्त । दुर्गा देवी कृपेने ।। १० ।। शके एकोणीसशे एकोणीस । ईश्वर नाम संवत्सरास । दत्तावधूत अनुवादास । दुर्गा आज्ञे करीतसे ।। ११ ।। काही ऐसे असती श्लोक । जे अश्लाघ्य सांप्रत । देवी क्षमा मागुनी त्याते । वर्जिले असे येथे हो ।। १२ ।। या कलियुगाभीतरी । स्तुती हेची पूजा ईश्वरी । म्हणोनी ग्रंथांतरी । आदरे लक्ष ठेवावे ।। १३ ।। पठण करिता दिव्य ग्रंथ । देवी स्वप्नात येत । मार्गदर्शन करीत । ऐसा दिव्य ग्रंथ हा ।। १४।। केवळ एक पारायण । करावे महानिशीजाण । ऐसे करिता सात दिन । दुर्गा कृपा होतसे ।। १५ ।। दुर्गा दुर्गार्ती हारिणी। ऐसे वर्णिले वेद पुराणी । त्या दुर्गेते स्तवोनी । कल्याण करावे आपुले ।। १६ ।। कुलदेवतादी दोष । ग्रहबाधा पीडा समस्त । होई दारिद्याचा नाश । पठण मात्रे ग्रंथाच्या ।। १७ ।। होतील सर्व इच्छा पूर्ण । योग साधना निर्वाण । समाधीचे साधन । तेही दुर्गादावीतसे ।।१८।। भक्ती, ज्ञान, शांती । सामर्थ्याची होय प्राप्ती । सर्व संशय निवृत्ती । दुर्गा कृपे होतसे ।। १९।। ही दुर्गेची वाङ्मय मूर्ती । प्रकटली पाहा येथप्रती । श्री दत्त जिची आरती । करीत राही सर्वदा ।। २० ।। असो संपला ग्रंथ । दुर्गेची आज्ञा घेत । दत्तावधूत आपुले चित्त । देवी चरणी वाहत ।।२१ ।। स्वस्ति श्री दुर्गा सप्तशती । तिन्ही लोकी जिची कीर्ती । ती देवी भगवती । पावो तुम्हा आम्हाते ।। २२ ।।
Devi Durga Ma Video Gallery | दुर्गा माँ की आरतियाँ, मंत्र, चालीसा और भजन वीडियो
शक्ति की देवी दुर्गा माँ 🙏🔥: अनंत शक्ति और साहस की प्रतीक #durgapuja #navratri #navratrispecial
शक्ति की देवी दुर्गा माँ 🙏🔥: अनंत शक्ति और साहस की प्रतीक #durgapuja #navratri #navratrispecial
माँ दुर्गा के दिव्य स्वरूप | बाल रूप से कन्या रूप तक का दिव्य दर्शन #durgapuja #durga #navratri
शेर पर विराजमान माँ दुर्गा का आशीर्वाद 🌺🦁 | जय माता दी 🚩🌟#durga #durgapuja #navratri #durgamaa
दुर्गा माँ का दिव्य रूप | जय माता दी 🚩🌟! शेरावाली की जय! #durgamaa #durgapuja #durga #navratri
दुर्गा माँ की अद्भुत महिमा | शेरावाली की जय | जय माता दी #durgamaa #navratri #navratri2024
दुर्गा माँ की अद्भुत महिमा | बच्ची का सुंदर स्वरूप | Jai Mata Di #durgamaa #navratri #navratri2024